माणूस वि. निसर्ग (की माणूस?)

(अनुभव मासिकात जून 13 च्‍या अंकात प्रसिध्‍द झालेला लेख) 

एखादा बिबट्या मनुष्‍य वस्‍तीत शिरल्‍याची बातमी येते, मोठ्या शहरात शिरला तर मोठी बातमी येते आणि लहान गावात शिरला आणि माणसांनी त्‍याला मारला तर अजूनच मोठी बातमी येते. यालाच माणूस वि. निसर्ग संघर्ष असेही म्‍हटले जाते. किंवा झाडे तोडू नका, एक तरी झाड लावा, किंवा पक्ष्‍यांना पाणी पाजा नाहीतर निसर्गाचे काही खरे नाही असेही म्‍हटले जाते. एकूणच आजकाल माणूस निसर्गाच्‍या भलताच मागे लागला आहे आणि निसर्गाला वाचवण्‍याची गरज आहे असे चित्र उभे राहते. 

माणूस निसर्गाच्‍या विरोधात जातोय किंवा निसर्ग आणि माणसाचा संघर्ष होतोय ही विधानं मला थोडीशी दर्पोक्‍तीची वाटतात. माणसाची कुवत इतकी कमी आहे की तो काय डोंबलाचा निसर्गाच्‍या विरोधात जाणार? नवेनवे विषाणू येऊन माणसाला मारत आहेत, अशा सर्व विषाणूंवरही मात करणे माणसाला जमत नाही. तंत्रज्ञान इतके पुढे जाऊनही भूकंप थांबवणे किंवा त्‍सुनामी थांबवणे माणसाला जमलेले नाही. फार तर अशा नैसर्गिक आपत्‍तींची पूर्वसूचना देता येते. पण हे तर पूर्वीही जमत होते. भारतावर कोसळलेल्‍या त्‍सुनामीच्‍या वेळी किनारपट्टीवरची असंख्‍य माणसे गेली, तेव्‍हा अंदमानातील ‘अतिमागास’ जारवा जमातीचे लोक मात्र निसर्गातल्‍या खाणाखुणा ओळखून सुरक्षित जागी निघून गेले होते. निसर्गाशी संघर्ष करायला माणूस अणुरणिया थोकडा आहे, हे स्‍पष्‍टच आहे.

अर्थात् निसर्ग हा कोणी सर्वशक्तिमान देव आहे किंवा काहीतरी गूढ गहन परमात्‍मरूप शक्‍ती आहे असे माझे म्‍हणणे नाही. निसर्ग ही एक व्‍यवस्‍था आहे. ज्‍यात प्रत्‍येक जीवाला विशिष्‍ट स्‍थान आहे. मर्यादा आहेत. मृत्‍यू आहे. बलस्‍थाने आहेत. जीवनाचे साधन आहे. एकाच्‍या मरण्‍यावर दुसर्‍याचे जगणे अवलंबून आहे. मेलेल्‍या प्रत्‍येक जीवाचे विसर्जन आणि अजाताचे सृजन या दोन्‍हीच्‍या व्‍यवस्‍था निसर्गात आहेत. या सगळ्यात माणूस हाही एक घटक आहे. नाटकातले एक पात्र आहे. पण हे पात्र थोडेसे आगाऊ असल्‍यामुळे – आपण नाटकाच्‍या बाहेर आहोत, कधी प्रेक्षक तर कधी निर्माते आहोत असा त्‍याचा समज झाला आहे.

आदिम काळात माणसाला निसर्गाची भीती वाटत असे. आपल्‍यापेक्षा मोठी अशी कोणीतरी शक्‍ती हे सगळे चालवत आहे, अशी त्‍याची श्रध्‍दा ही अनाकलन, भय, आणि अवलंबन या तिन्‍हीतून निर्माण झाली असेल. वादळ का होते, तुफान पाऊस का पडतो, आजार का होतात, वणवे का लागतात या गोष्‍टींची कारणे माणूस शोधत होता. जसजशी कारणे कळत गेली, तसे अनाकलन कमी झाले पण अवलंबन शिल्‍लक राहिले. त्‍यामुळे श्रध्‍दा राहिली. निसर्गास दुखवले तर त्‍याचा कोप होईल, ही भक्‍तभावना राहिली. वननिवासी समाजांनी ‘निसर्ग’ नावाच्‍या एका सर्वव्‍यापी अमूर्त विराटाची कल्‍पना केली नाही. पण त्‍यांनी त्‍याच्‍या घटकांची पूजा मांडली. वारा पाऊस आणतो म्‍हणून त्‍याची पूजा. अग्‍नी अन्‍न शिजवतो म्‍हणून त्‍याची पूजा. नदी पाणी पुरवते म्‍हणून ती लोकमाता. धरतीतून अन्‍न उगवून येते म्‍हणून ती आई. काही झाडे औषधे देतात, काही जिवाणूयुक्‍त माती देतात, काही पाणी दाखवतात, तर काही झाडे आणखी काही कामास येतात – म्‍हणून त्‍यांना देवत्‍व. हे खरे तर देवाणघेवाणीचे नाते आहे. संस्‍कृती वगैरे म्‍हणायचे तर यात एक किमान सुसंस्‍कृतपणा हा आहे की आपल्‍याला जे उपयोगी पडतात त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञतेची भावना असावी.

तंत्रज्ञान विकसत गेले तसे निसर्गावर अवलंबून असण्‍याची जाणीव कमी होत गेली. अवलंबन कमी होणे कधीच शक्‍य नाही, पण त्‍याची जाणीव गुल् झाली. टॉम हँक्‍सच्‍या कास्‍ट-अवे चित्रपटातला नायक त्‍याचे विमान समुद्रात कोसळल्‍यावर वाचतो आणि एक निर्जन बेटावर येऊन पोचतो. तिथे अन्‍न गोळा करण्‍यासाठी त्‍याला खूप कष्‍ट करावे लागतात. आणि हात सोलून निघेपर्यंत लाकडे घासून त्‍याला एकदाची आग पेटवता येते. ती आग पेटल्‍यावर त्‍याला झालेला आनंद विलक्षण असतो. अशा आदिम स्थितीत माणसाला निसर्गातल्‍या प्रत्येक गोष्‍टीची तीव्र जाणीव असते. पण शहरातल्‍या आपल्‍या सुसज्‍ज फ्लॅटमध्‍ये एक बटण दाबून जेव्‍हा विजेची शेगडी पेटते आणि खोक्‍यातले तयार अन्‍न सहज शिजते, तेव्‍हा निसर्गाची कुठलीच जाणीव आपल्‍याला होत नाही. आपण खात असलेले अन्‍न कुठून आले, कुठे पिकले, आपण वापरत असलेले पाणी कुठून कसे आले, आपण वापरत असलेली उर्जा कुठून आली याविषयी शून्‍य जाणीव आपल्‍याला असते. ही तंत्रज्ञानाने आपल्‍याला आणलेली गुंगी आहे. आदिम मानव निसर्गावर जितका अवलंबून होता, तितकेच आपणही आहोत. पण याची जाणीव तंत्रज्ञानाच्‍या मायेने मिटवली आहे.

शहरातल्‍या मुलांचे ‘भैया दूध देतो’ किंवा ‘साखर रेशन दुकानात पिकते’ हे विनोद याच निसर्गनेणिवेतून तयार झाले आहेत. हे बालविनोद बाजूला ठेवले, तर मोठी माणसे नकळत याहून मोठे विनोद करत असतात. ‘बॅक टू नेचर’ किंवा ‘चला निसर्गाकडे जाऊया’ हे खूप चलनात असलेले विनोद आहेत. याचा अर्थ असा की, आपण निसर्गापासून स्‍वतंत्र आहोत, आणि एखाद्या सप्‍ताहांती जंगलात, डोंगरात, समुद्रावर आपण फिरायला जातो तेव्‍हा कुठे थोडासा निसर्ग आपल्‍याला भेटतो! अवलंबनाची जाणीव पूर्ण संपून आता करमणुकीसाठीच काय तो निसर्ग उरला आहे – अशा समजुतीत आपण वावरतो आहोत.

निसर्ग नावाच्‍या व्‍यवस्‍थेवर माणूस नावाच्‍या घटकाचा ताण पडत असेल तर यथावकाश ती व्‍यवस्‍था हा घटक नष्‍ट किंवा कमी करेल. निसर्गाचा कोणी कर्ता नसल्‍यामुळे निसर्ग माणसाला धडा शिकवेल वगैरे असे काही नाही. पण कोणतीही व्‍यवस्‍था काही मर्यादा आणि नियमांवरच चालत राहते. ज्‍या घटकाने नियम मोडले तो घटक दूर करणे हे एक अंतर्भूत तंत्र (बिल्‍ट-इन मेकॅनिझम) या व्‍यवस्‍थेत आहे. डायनासॉर संपले, इतर काही हजार प्रजाती संपल्‍या, तसेच माणूसही संपू शकतो. मग निसर्गाचे काय होणार? काहीही नाही, त्‍याचे चक्र फिरत राहणार.

मग आपण ‘निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा’ असा जो जागतिक आरडाओरडा करतोय तो कशासाठी? हे खरे तर आरशात बघून आरशातल्‍या त्‍या माणसाला वाचवा असे म्‍हणणे आहे. निसर्गातल्‍या विविध घटकांना माणसाने शोषल्‍यामुळे आता माणसालाच हे घटक कमी पडताहेत, आणि म्‍हणून हे घटक वाचवा असे आपण बोंबलतो आहोत. निसर्गतः माणूस इतर प्राण्‍यांप्रमाणेच स्‍वार्थी आहे. स्‍वार्थासाठी जसे पूर्वी निसर्गाला देवत्‍व दिले होते, तसे आता ग्‍लोबल वार्मिंगचा हार घातला आहे. माणूस वाचावा म्‍हणून निसर्ग वाचवणे अशी ही धडपड आहे.

इतका जर माणूस कमजोर आहे, तर निसर्गाला त्‍यापासून काय धोका असणार? माणूस निसर्गाचे शोषण (का काय म्‍हणतात ते) कधीपासून करतोय्? मला वाटतं की, संपत्‍तीची साठवण ही कल्‍पना माणसाला सुचल्‍यापासून हे चालू असेल.

भुकेपुरती शिकार किंवा खाण्‍यापुरती फळे, कंद गोळा करणे यात निसर्गातल्‍या इतर प्राण्‍यांपेक्षा वेगळे काही नव्‍हते. माणूस शेती करायला लागला तसे त्‍याचे नाते बदलू लागले. प्रारंभीची शेती फिरती होती. त्‍यात एका जमिनीच्‍या तुकड्याला कुंपण घालून ‘माझी प्रॉपर्टी’ असे म्‍हणणे हा भाग नव्‍हता. तोपर्यंत गरजेपेक्षा जास्‍त घेणे हे शक्‍यच नव्‍हते. फिरत्‍या समुहाकडे खूप प्रॉपर्टी साठली तर त्‍याला फिरताना ओझे होणार, त्‍यामुळे तो गरजेपुरते घेणार आणि पुढे जाणार. जशी लोकसंख्‍या वाढली, तशी फिरती शेती परवडेना झाली. लोक स्थिर शेती करायला लागले. शेतीत शिकारीसारखा झटपट फायदा नव्‍हता, अन्‍न मिळायला वाट बघावी लागणार होती. पण शिकारीत नसलेली शाश्‍वती इथे होती. वाट बघावी लागणार म्‍हटल्‍यावर कुंपण घालणे आलेच. इतर श्‍वापदे आणि माणसांपासूनही आपल्‍या शेतीची राखण आली. मोठ्या शिकारीत टोळीचे सामुहिक प्रयत्‍न लागतात, शेतीत कुटुंबातील माणसे पुरेशी असतात. कुटुंब हा घटक टोळीपेक्षा महत्‍त्‍वाचा व्‍हायला लागला, तो बहुधा इथूनच. वैयक्तिक संपत्‍ती, बचत, पुढच्‍या काळासाठी साठवण या गोष्‍टी आल्‍या. गरजेपेक्षा जास्‍त घेणे शक्‍य झाले आणि तेच शहाणपणाचे ठरले. निसर्गातले इतर प्राणी आणि माणूस यांच्‍यातला एकमेव भेद इथे निर्माण झाला.

कष्‍टमुक्‍त जगणे हे प्रत्‍येक जीवाला हवेच असते. अगदी पाळीव मांजराला सुध्‍दा दोन वेळा भरपेट खायला घातले, तर ते उंदीरबिंदीर पकडायच्‍या भानगडीत मुळीच पडत नाही. माणसालाही कष्‍ट कमी असणारे जीवन हवेच असते. त्‍यात भविष्‍यकाळासाठी जितकी जास्‍त बेगमी होईल तितका मी सुखी या कल्‍पनेनेही माणसाला पछाडलेले असते. आळस ही अनेक शोधांची जननी आहे. बटण दाबताच सगळे हजर हे माणसाने आपले ध्‍येय ठरवले. नव्‍याण्‍णव रूपये खिशात असले, तरी आणखी एक का नाही – हे नव्‍याण्‍णवाचे भूत माणसाने मानेवर बसवून घेतले. आणि अजून अजून अजून… अशी धावाधाव चालू राहिली. यात ‘निसर्गाचे शोषण’ असे ज्‍याला म्‍हटले जाते ते सुरू झाले.

हजारो वर्षे माणूस आहे, त्‍यातली काही शेकडो वर्षे माणूस शेती करतो आहे, शहरे वसवतो आहे, जंगलतोड करतो आहे, आणि गेली शंभरदीडशे वर्षे यंत्रशक्‍तीने वाट्टेल ते करतो आहे. तरीही ‘निसर्गाचे शोषण’ जाणवायला लागले ते मात्र गेली एकदोन दशके. असे का?

कारण आता हे गळ्याशी आले आहे. पायावर पाय पडताहेत. निसर्गाशी संघर्ष नसून माणूस माणसाशी संघर्ष करतो आहे. जी काही मर्यादित निसर्गसंपदा आहे, ती मलाच कशी मिळेल यासाठी माणसांच्‍या टोळ्यांचे संघर्ष आता सुरू आहेत. टोळ्या म्‍हणजे वेगवेगळे हितसंबंध असणारे मानवी समाजातले राजकीय आणि आर्थिक गट. या माणूस-माणूस संघर्षाची मला दिसणारी काही उदाहरणे सांगतो.

मी राहतो त्‍या गावातले एक उदाहरण आहे. आमच्‍या जंगलात उदंड आंब्‍याची झाडे आहेत. ज्‍याला जेव्‍हा पाहिजे तेव्‍हा हवे तेवढे आंबे खायला मिळतात. कोणीही कच्‍चे आंबे उतरवून घरात पेंढ्यात घालून पिकवत नाही. आंबे झाडावर पिकतात आणि तिथेच खायलाही मिळतात. पण आमच्‍या गावात मोहाची झाडे दोनच उरली आहेत. पहाटे, खरे तर रात्री साडेतीन चार वाजताच लोक मोहाची फुले वेचायला तिथे जातात. उशीर झाला तर बाकीचे लोक फुले नेतील म्‍हणून. आंब्‍याची झाडे म्‍हणजे Economy of abundance आणि मोहाची झाडे म्‍हणजे economy of scarcity आहे. आपण आंब्‍याकडून मोहाकडे म्‍हणजे म्‍हणजे समृध्‍दीच्‍या अवस्‍थेकडून कमतरतेच्‍या अवस्‍थेकडे चाललो आहोत. मोहाखाली जी स्‍पर्धा चालते ती माणूस विरूध्‍द मोह अशी नाही, ती माणूस विरूध्‍द माणूस अशी आहे. आमचे घर दोन दिवसांनी सारवायचे होते, तेव्‍हा आत्‍ताच भरपूर शेण साठवून ठेवूया असे मला वाटत होते. माझा गावातला मित्र मला हसला. म्‍हणाला, आपल्‍या गावात गुरं भरपूर आहेत, ती रोजच शेण देतात. कशाला साठवायचे, भरपूर शेण असते. जी गोष्‍ट भरपूर असते, ती कोणी साठवत नाही. जी गोष्‍ट कमी होते, ती गोष्‍ट माणूस वखवखल्‍यासारखी साठवून ठेवतो. निसर्गातली साधने कमी होताहेत तशी स्‍पर्धा-संघर्ष तीव्र होतो आहे. ही झाली सूक्ष्‍म स्‍तरावरची आणि बिनगुंतागुतीची उदाहरणे, आता बृहद् स्‍तरावरचे जंजाळ पाहू.  

उदाहरण 1: पिंपरी चिंचवड नावाचे एक महानगर असते, ते एकसारखे वाढत असते. अर्थातच त्‍याला लागणारे पाणी, उर्जा ही भूकही वाढतच असते. जुन्‍या पाणी साठ्यावर त्‍यांचे भागत नसते. तिथून राजाला प्रचंड महसूल मिळत असल्‍यामुळे तेथील मनुष्‍यसमूह अधिक महत्‍वाचा असतो. दूर कुठे तरी एक पवना नदीवरचे धरण असते. त्‍या धरणातल्‍या पाण्‍यावर मावळातील शेतकरी आपली शेती पिकवत असतात. तो मनुष्‍यसमूह महसूल देत नाही, म्‍हणून राजासाठी ते कमी दर्जाचे असतात. मग तिथल्‍या धरणाचे पाणी त्‍यांना न देता महानगराला दिले जाते. मग शेतकरी रस्‍त्‍यावर उतरतात, राजाचे शिपाई त्‍यांना गोळ्या घालतात, पण पाणी राजाला हवे तिथे घेऊन जातात. पाणी विरूध्‍द माणूस असा तर हा संघर्ष दिसत नाही.

उदाहरण 2:  मुंबईला वीज हवी असते. आयपीएलचे रात्रीच रंगणारे सामने आणि प्रचंड मॉलला गार ठेवणारे एसी या प्राथमिक गरजा भागवण्‍यासाठी ही वीज हवी असते. औष्णिक वीज बनवायची तर भट्टी गार करायला समुद्राचे भरपूर पाणी लागते. मग कोकणपट्टीतली एखादी जागा निवडली जाते. तिथे समुद्रातले पाणी स्‍वच्‍छ असेल, तर तिथल्‍या मच्‍छीमारीवर पोट भरणारे काही हजार लोक असतात. आंबा-पोफळी-माडाची बागायती करणारी किंवा त्‍यात मजुरी करणारी काही हजार कुटुंबे असतात. म्‍हणजे तिथले पाणी आणि जमिनी या निसर्गावर हक्‍क असणारा एक मनुष्‍यसमूह असतो. त्‍यांचा हक्‍क काढून घेऊन तो मुंबई नावाच्‍या टोळीला घ्‍यायचा असतो. मुंबईच्‍या ‘प्राथमिक गरजा’ महत्‍त्‍वाच्‍या असे राजा ठरवतो. जैतापूर किंवा दाभोळ (किंवा अशीच अजून कुठलीही दहापंध्रा नावे) गावातले लोक कमी महत्‍त्‍वाचे असेही राजा परस्‍पर ठरवतो. इथे प्रकल्‍पाला विरोध करणार्‍या लोकांना विकासाचे विरोधक आणि प्रकल्‍प लादणार्‍या लोकांना पर्यावरणाचे विरोधक अशा संज्ञा प्रचलित आहेत.

उदाहरण 3: खनिजतेल कमी वापरा अशी बोंबाबोंब अमेरिकेत कधी सुरू झाली? अरबांनी तेलविहीरींचे लगाम आवळल्‍यावर. संस्‍थानिक राजेरजवाडे आणि जिम कॉ‍र्बेटसारख्‍या शिकार्‍यांनी नेहरूंच्‍या मागे लागून गेम रिझर्व्‍ह – म्‍हणजे राखीव जंगले करून घेतली. ती कशाला? जंगले संपतील या चिंतेने नव्‍हे, तर आपल्‍याला शिकार करायला प्राणीच उरणार नाहीत या चिंतेने. त्‍यात काही लोकांनाच प्रवेश मिळेल आणि शिकारीचा परवाना मिळेल अशी सोय त्‍यांनी करून घेतली. जंगलात पूर्वीपासून राहणार्‍या लोकांना तिथून हाकलून लावले, की झाले नॅशनल पार्क. भरतपूरचे पक्षी अभयारण्‍य करतानाही तिथल्‍या म्‍हैसवाल्‍या गवळ्यांना हाकलून दिले होते. भरतपूरला श्रीमंत शिकार्‍यांनी येऊन हजारो चित्‍ते, बिबट्ये, आणि पक्षी मारले होते. त्‍यांच्‍या चुकीचे प्रायश्चित्‍त मात्र गवळ्यांना भोगावे लागले. आम्‍ही आधीच भरपूर शोषण केले आहे, आता तुम्‍ही मात्र करू नका अशी या महाजनांची भूमि‍का होती.

निसर्गसंपत्‍ती खूप कमी उरली आहे आणि त्‍यामुळे तिची किंमत खूप वाढली आहे. तीवर मालकी कुणाची हा संघर्षही तीव्र झाला आहे. याच संघर्षाला माणूस वि. निसर्ग अशा काल्‍पनिक संघर्षाचा बुरखा आहे. जंगलात राहणारे लोक (किंवा खेड्यात राहणारे) निसर्गाची खूप हानी करतात, ते चुलीत जाळायला लाकडे तोडतात, वस्‍तीजवळ बिबट्या आला तर त्‍याला मारतात. या गोष्‍टीची प्रचंड काळजी शहरात राहणार्‍या अनेक संवेदनशील लोकांना असते. पण आपण इन्‍हेस्‍टमेंट म्‍हणून जे दोन-तीन फ्लॅट घेऊन ठेवले आहेत, ते बांधताना तिथे शहराचा विस्‍तार होताना निसर्गाचा किती संहार झाला हे काही त्‍यांच्‍या गावी नसते. आपल्‍या विजेचा वापर बेफाट आहे, एक तासाचे लोडशेडिंगही आपल्‍याला सहन होत नाही, फ्रीजसुध्‍दा इन्‍हर्टरवर चालला पाहिजे, शेवटी काय दरडोई वीजवापर जितका जास्‍त तितके आपण विकसित (इति अनिल काकोडकर आणि जगद्गुरू अमेरिका). याच विजेसाठी धरण बांधण्‍यात किंवा कोळसा काढण्‍यात, वाहण्‍यात, निसर्गाची किती हानी आपण करत असतो, याचे मोजमाप नसते. पण आपली एखाददुसरी गाय किंवा बकरी वाचवण्‍यासाठी जो जिवावर उदार होऊन बिबट्याला मारायला धावतो, तो खेडूत मात्र पर्यावरणाचे मोठेच नुकसान करत असतो.

थोडक्‍यात असे की आपण एकमेकांकडे बोटे दाखवत आहोत. पुढे जमेल तेव्‍हा एकमेकांच्‍या उरावरही बसू. निसर्गाशी संघर्ष करायला तो आपल्‍या बरोबरीचा असायला हवा ना? तसे नाही. त्‍याच्‍याकडे लढायला ना दात ना नखे. आपणच आपल्‍या कर्माने मरणार म्‍हणजे निसर्ग. त्‍यामुळे आताचा संघर्ष हा माणसाचा माणसाशी निसर्गातला वाटा मिळवण्‍यावरून चाललेला संघर्ष आहे.

माणसाने निसर्गाला नागवण्‍याच्‍या प्रत्येक घटनेत माणसाने माणसाला नागवण्‍याची घटना अपरिहार्यपणे असते. मग ते लव्‍हासा असो, सरदार सरोवर असो, गीर नॅशनल पार्क असो, पॉस्‍कोची खाण असो, किंवा एनरॉन असो.

हे म्‍हणजे तुम्‍ही अगदी सगळ्याच गोष्‍टींना नावे ठेवता, मग आम्‍ही ‘विकास’ करायचा तरी कसा? असा प्रतिप्रश्‍न यावर हमखास विचारला जातो. ‘विकास’ कोणाचा हा प्रश्‍न गुलदस्‍त्‍यात ठेवला जातो. आणखी वीजनिर्मिती झाल्‍याशिवाय आपला विकास होणार नाही, असे म्‍हटले जाते. तेव्‍हा ही वीज कोणासाठी हे जाहीर केले जात नाही. ज्‍यांच्‍या जीविकेचा बळी देऊन किंवा ज्‍यांची गावे बुडवून किंवा ज्‍यांची नैसर्गिक संसाधने कब्‍जात घेऊन ही वीज निर्माण होणार त्‍या विजेतला किंवा विकासातला त्‍यांचा वाटा किती? याचे उत्‍तर दिले जात नाही. ज्‍यांना बुडवले किंवा हटवले जाते, त्‍यांनाही ही उत्‍तरे मिळत नाहीत. आमच्‍या भागात (ता. जव्‍हार जि. ठाणे) येथे प्रस्‍तावित धरणात ज्‍यांच्‍या जमिनी बुडणार आहेत, त्‍यांना तर जमिनीची किती किंमत मिळणार हेही सांगायची तसदी राज्‍यकर्त्‍यांनी घेतलेली नाही. ‘उत्‍तम पुनर्वसनाची तरतूद, पर्यटन व बांधकामातून रोजगाराची संधी’ अशी भोंगळ माहिती सरकारने दिली आहे. 23 हजार रू. हेक्‍टरी मिळतील, किंवा वीसेक लोकांना पर्यटनात रोजगार मिळेल, शंभर लोकांना एक दोन वर्षे अकुशल मजुरीचे काम मिळेल, कायमस्वरूपी नोकरी एकदोन जणांनाच (वाचाः पुढार्‍यांच्‍या मुलांनाच) मिळेल. अशी खरी माहिती सरकार देत नाही. म्‍हणून संघर्ष उभा राहतो. ‘विकास, विकास, विकास’ म्‍हणून जे काही होत, त्‍यात देशातल्‍या अडीच कोटी विस्‍थापित लोकांचा विकास कसा काय बसत नाही? माणसाने निसर्गावर ‘विकास’ नावाचे जे आक्रमण चालवले आहे, त्‍यातून हा एक नव ‘अस्‍पृश्‍य’ समाज वाढत चालला आहे. सर्वसमावेशक विकास नसेल, तर लोकशाहीला काय अर्थ उरतो?

विकास हवाच, पण तो काही जणांना नागडे आणि भुकेकंगाल करून कशाला? सर्वांना सन्‍मानाने जगण्‍यासाठी लागणार्‍या गोष्‍टी मिळाल्‍याच पाहिजेत. देशातल्‍या बहुसंख्‍य जनतेची रोजीरोटी नैसर्गिक संसाधनांवर आणि या संसाधनांवर असलेल्‍या त्‍यांच्‍या हक्‍कावर अवलंबून आहे. हे हक्‍क आणि संसाधने हिरावून घेतली तर हे लोक सुखाने कसे काय जगू शकतील? मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवे बांधताना काही कातकरी वाड्या हटवल्‍या गेल्‍या. या लोकांच्‍या जमिनी गेल्‍याच, पण त्‍यांना जीविकेचे दुसरे काहीच साधन सत्‍ताधारी टोळीने दिले नाही. आता यातले काहीजण एक्‍सेप्रसवे वरच लुटमारी करू लागले आहेत. त्‍यातले जे लोक असे काहीच करत नाहीत, त्‍यांनाही पोलिस संशयाने धरतात आणि ठोकून काढतात. नवीन गुन्‍हेगार जन्‍माला घालण्‍याला एक्‍स्प्रेसवेला विकास म्‍हणणारे आपण सर्वच जबाबदार नाही का? आपल्‍याच देशाच्‍या नागरिकांना विकासातून अस्‍पृश्‍य करण्‍याने निसर्गाची आणि लोकशाहीचीही जबर हानी होते आहे.

आपण सर्व नवस्‍वातंत्र्याच्‍या युगातले आहोत. व्‍यक्‍ती म्‍हणून आपले स्‍वातंत्र्य आपल्‍याला कमालीचे मोलाचे वाटते. रात्री शहरातल्‍या हमरस्‍त्‍यांवर आपली स्‍वेच्‍छावस्‍त्रे घालून फिरताना कोणी छेड काढली किंवा पोलिसांनी टोकले तरी (फेसबुकवर) प्रचंड खळबळ माजते. इतके स्‍वातंत्र्य आपल्‍याला मोलाचे वाटते. स्‍वातंत्र्याच्‍या पुरस्‍कर्त्‍या एका फ्रेंच तत्‍वज्ञाने म्‍हटले होते, ‘माझा हात वाटेल तसा हलवण्‍याचे मला स्‍वातंत्र्य आहे, पण ते इतकेच की हात दुसर्‍याच्‍या नाकाला लागता कामा नये.’ विकासाचे जे स्‍वातंत्र्य आपल्‍याला हवे आहे, त्‍यातही हे भान ठेवलेच पाहिजे. अन्‍यथा दुसर्‍याचाही हात आपल्‍याला कधी ठोसा देईल ते सांगता येत नाही.

कोणाचे नुकसान करू नका, त्‍या विस्‍थापित लोकांना काय हवं ते पुनर्वसन द्या, पण प्रकल्‍प कराच. असे म्‍हणण्‍याचा अनिवार मोह संवेदनशील विकासवाद्यांना होतोच. हे असं करता येईल का, हे काळ आपल्‍याला सांगेलच. पण माझा अंदाज असा आहे की असे जमणार नाही. निसर्ग किंवा नैसर्गिक संसाधनांवर मनुष्‍यजातीचा भार इतका आहे, की निसर्गाचे दोहन कमी करणे हेच यावरचे एक उत्‍तर असणार आहे. एसी कुठे लावता येईल याचा प्‍लॅन करण्‍यापेक्षा घरात नैसर्गिक वारा कसा वाहील याचा विचार करावा लागणार आहे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास, विजेचा कमी वापर, पाण्‍याचा जास्‍तीत जास्‍त पुनर्वापर, इन्‍हेस्‍टमेंटचा म्‍हणजे साठवणुकीचा अतिरेक टाळणे आणि अशी अनेक बंधने स्‍वीकारणे भाग आहे. आपला हात दुसर्‍याच्‍या नाकाला लागू नये म्‍हणूनच ही बंधने आहेत. हा दुसरा म्‍हणजे दुसरा माणूस आणि निसर्ग असे दोघेही असणार आहेत.

– मिलिंद थत्‍ते

मु. कोगदा-पाटीलपाडा, पो. कोगदे  

ता. जव्‍हार जि. ठाणे 401603

milindthatte@gmail.com            

    

Advertisements

16 thoughts on “माणूस वि. निसर्ग (की माणूस?)

Add yours

 1. Mahatma Gandhi said, ‘there’s enough for everybody’s need for not for everybody’s greed’.
  Also read somewhere a rather sarcastic but a very telling comment (in response to an article appealing people to save the earth), ‘don’t talk of saving the earth, if you can save yourselves, that will be quite enough!’

 2. Wonderful ! Many points r shown aptly. To improve all this, “reducing our needs” is d correct soln. However to achieve same, all of us need to attack on 3 more problems of our country. 1.Over population, 2.Laziness of most individuals & 3.Lack of “Desh-bhakti” in many.

 3. लेखात निसर्ग आणि माणूस यांच्या संबंधावर अचूक बोट ठेवण्यात आले आहे.पण दुर्दैवाने कोणीच याचा विचार करत नाही.अगदी आमच्या सारखे (त्यात मीही आलोच) मध्यमवर्गीय आणि आता उच्चभ्रू झालेले आपण कोणत्या परिस्थितीत दिवस काढले त्यावेळी ज्या काटकसरीने रहात होतो तसेच आता राहूया असा विचार करत नाही.शॉवरला पाणी येतेय ना मग करा अर्धा तास त्याची नासाडी.त्यावेळी पाणी नसताना अर्ध्या बादलीत अंघोळ होत होती हे विसरतो.पिण्यासाठी सुद्धा पेल्यात पाहिजे तितकेच पाणी घ्यावे एबढाही विवेक नसतो.पेला भरून घेणार आणि निम्मा पेला ओतून टाकणार जे पाण्याचे तेच अन्नाचे. बफे मध्ये बश्या अगदी भरभरून घ्यायच्या व त्यातील निम्मे टाकून द्यायचे.ज्या खोलीतून बाहेर जातो तेथील दिवा पंखा तसाच राहू द्यायचा.आमच्या सोसायटीतील काहीजण गावाला जाताना नळही बंद करायचे विसरतात आणि पाणी आल्यावर जेव्हा इतरांच्या छतातून धारा कोसळायला लागतात त्यावेळी त्याना फोन करून त्यांच्या किल्ल्या मागवून तो पाऊस बंद करावा लागतो. आणखीही कितीतरी अशी उदाहरणे देता येतील पण आपण आपल्याला झळ बसेपर्यंत सुधारायचेच नाही असा वसाच घेतलेला,त्याला कोण काय करणार ?

 4. वा मिलिंद! अप्रतिम लिहिले आहेस. नियमित आणी भरपूर लिहीत रहा! हा अतिशय महत्वाचा विषय आहे…

 5. माझ्या ‘वाचावे असे काही’ या उपक्रमातून अनेकांपर्यंत मी हा उत्तम विचार प्रवर्तक लेख पाठवतोय.

 6. लेख अतिशय उत्तम. जरा मार्क्सिस्ट अंगाने मांडणी केली आहे परंतु एकदम सहजसोप्या भाषेत आणि मनोवेधक. अधेमध्ये कांट, लॉक, मिल वगैरे पण डोकावून जातात पण अजिबात जाणवत नाहीत. उत्तम. स्वानुभव, कळकळ आणि आत्मचिंतनातून उमजलेले आहे. Could not agree more. महात्मा गांधींचे Need-Greed वाले वाक्य वाचताना पदोपदी आठवत होते.

  पाश्चात्य जगात लिबरल विचारांनुसार मानवाची सतत एकमार्गी प्रगती गृहीत आहे. ती होतच राहणार आणि त्याकरताच प्रयत्न केले पाहिजेत. मग तो एका माणसाचा पगार असो, कंपनीचा नफा असो कि देशाचे सकल उत्पन्न. यात वाढ होत नसेल तर तर ते नुकसान आहे. शहराची वाढ झाली पाहिजे, उद्या अजून गाड्या विकल्या गेल्या पाहिजेत, चार दुकाने अजून निघून त्यातून सरकारलादेखील वाढीव कर पाहिजे. जेव्हा कुदळ-फावडे घेऊन खड्डा खणायचो तेव्हा त्याला मानवी श्रमांच्या मर्यादा होत्या. आता एक नवा जेसीबी कर्ज काढून घेतला कि त्याची भूक अनेक डोंगर खाल्ले तरी भागत नाही. आणि जर नाही खाल्ले तर जेसीबीचे कर्ज फेडले जाणार नाही. वर म्हटले आहे कि समृद्धी असली की स्पर्धा कमी असते आणि कमरता असली की स्पर्धा वाढते. अनेक पाश्चात्य देशात हि समृद्धी कशी वाढवावी यावरच भर दिसतो. The American way of life is non-negotiable असे धाकटे बुशसाहेब म्हणाले होते.

  परंतु त्यापेक्षा यावर तुम्ही म्हणता तो उपाय म्हणजे गरजा कमी करणे – आणि हे काम व्यक्ती-समाज-देश-जग या सर्वच पातळ्यांवर व्हायला हवे. ते कसे आणि कधी होईल हे आज तर सांगणे अवघड आहे. एकच अशा कि फार उशीर व्हायच्या आत ते व्हावे.

 7. हा लेख कमाल लिहिला आहेस . अमोल ने म्हटल्याप्रमाणे विदारक सत्य . आणि मनावर ओरखडे काढणारा उपहास . अस्वस्थ करणारे साहित्य श्रेष्ठ मानले जाते . त्यापैकी एक .

 8. मिलिंद,
  काय म्हणू ! लेख परखड ! वास्तव विदारक ! त्यातला माझा सहभाग टोचणी लावणारा ! प्रयत्न चालू आहेत… काही वैयक्तिक पातळीवर…काही गटाने…असो…

  एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो या निमित्ताने… समृद्धी असली की स्पर्धा कमी असते आणि कमरता असली की स्पर्धा वाढते…हे स्वाभाविकपणे दिसते…पण आत्ता असा वाटायला लागले आहे की आपण सगळे जण एकमेकांना जोडलेलो आहोत…काही गोष्टीमधून तरी हे जाणवते…आपल्यामधला हे बंधुत्व परिस्थिती निरपेक्ष जोपासायला हवं…मूल्य म्हणून जपायला हवं…त्यातून एका नव्या समृद्धीची जाणीव होईल अशी आशा वाटते…निदान त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत असं वाटायला लागला आहे

  1. अमोल, अचूक 🙂

   – मिलिंद Milind
   +91 9421564330

   Vayam वयम् – आपल्‍या विकासाची आपली चळवळ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: