गरजेपुरता सामाजिक

वेर्रिएर एल्विन हा विलायतेतून १९२७ साली हिंदुस्तानात आला. मध्य प्रदेशातल्या गोंड गावात १२ वर्षे राहिला. भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने भारतीय नागरिकत्व घेतले. आणि नेहरूंच्या काळात ईशान्य भारतातील आदिवासी विषयक सल्लागार म्हणून त्याने काम केले. त्याने व्यापक लिखाणही केले. १९४४ साली त्याने लिहिलेले अबोरिजिनल्स नावाचे पुस्तक आहे. त्यात त्याने कळवळून म्हंटले आहे, “देशातले अदमासे ८० टक्के आदिवासी हे आता बाहेरच्या जगाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या समस्या या इतर ग्रामीण भागाप्रमाणेच आहेत. त्यांच्या बाबतीत वेगळे धोरण असण्याची गरज नाही. पण २० टक्के मात्र अद्याप दुर्गम आहेत. ते त्यांच्या जुन्या जीवन शैली प्रमाणे आनंदात जगत आहेत. त्यांच्यावर  सरसकट ‘आधुनिक शिक्षण’ ‘विकास’ वगैरे लादू नये. म्हणजे त्यांनी तसेच राहावे असे नाही, त्यांना आरोग्य सेवा मिळायला हवी, योग्य शिक्षण मिळायला हवे. पण त्यांची वृत्ती, आनंद, संस्कृती टिकले पाहिजे…”  
म्हणजे विकास तर हवा, पण गाळीव हवा. –  एल्विनची ही वैचारिक कसरत खरं तर शंभर वर्षे जुनी आहे. पण माझ्या पिढीत आदिवासी गावात राहणाऱ्या कार्यकर्त्यालासुद्धा ही कसरत समजू शकते. आधुनिकीकरण आपल्याला हवे तसे गाळून घेता येत नाही. एकदा ते येऊ लागले की त्यातले बरे वाईट सगळेच येते. ते बरेचदा अपरिहार्य असते. हे सारे आमच्या तार्किक मनाला समजते, पण समोर काही तरी सुंदर दिसते आहे आणि ते नष्ट होणार याचे दु:ख व्हायचे तेही होतेच. एल्विन लोकांच्यात राहत होता. त्यांच्या जगण्याचा अर्क त्याला उमजला होता. त्यामुळेच तो या द्वैतात सापडला असावा. 
एल्विनने मध्य भारतात १९४० साली घेतलेले अनुभव आणि आमचे आत्ताचे मुंबईपासून जेमतेम १५० किमीवर असलेल्या गावातले अनुभव यांची तुलना होऊ शकणार नाही हे तर खरेच. पण आधुनिकीकरण येत असताना आदिवासी समाजाचे जे काही जाईल असे तो म्हणत होता, ते जाताना मात्र आम्हाला आज दिसते आहे. काळाच्या घड्याळातले हे वाळूचे कण आहेत. ते जाणारच आहेत. पण ते हातातून जात असताना टिपून तरी ठेवावेत असे आम्हाला वाटते. माणूस नावाच्या सामाजिक प्राण्याचा जेंव्हा इतिहास लिहायचा असेल, तेंव्हा आपण “का बरे सामाजिक होतो” याचे उत्तर शोधावे लागेल. तेंव्हा हेच वाळूचे कण उपयोगी पडतील. कारण आजही ज्यांना समाज म्हणून काही जीवन आहे, असे थोडेच लोक शिल्लक आहेत. त्यांच्यात आत्ता होणारे बदल नीट पाहिले तर हे समजू शकेल. 
 … … … … … … 
सह्याद्रीतल्या आदिवासी समाजात (म्हणजे वारली, कोकणा, ठाकूर इ.) दर तीन ते पाच वर्षांनी रवाळी असते. गावातले सर्व पुरुष आठ रात्री गावाबाहेर जंगलात जाउन राह्तात. काही व्रते पाळतात. मांसाहार करत नाहीत, शिकार करत नाहीत. दारू पित नाहीत. दिवसभर उपास करतात. रात्री गावदेव आणि कणसरी मातेसमोर घुमतात. तार्प्याच्या सुरांवर रात्र रात्र नाचतात. जंगलातल्या दुष्ट शक्तींपासून गावाचे रक्षण व्हावे, शेतातल्या पिकावर कणसरीची कृपा असावी, जनावरांचे वाघदेवाने रक्षण करावे, आपण जंगलाला दुखावले असेल तर त्याची माफी मिळावी असा हेतू या रवाळीच्या व्रतामागे असतो. मागच्याच आठवड्यात आम्ही राहतो त्या पाटीलपाडा गावातली रवाळी झाली. गावातला रहिवासी म्हणून मीही त्यात होतो. रात्री जंगलातच उघड्या माळावरच मुक्काम असतो. रात्री घुमणे झाले कि मग जेवण होते आणि अनेक शेकोट्यांभोवती लोक पथारी पसरतात. म्हातारी माणसं बिड्या लावतात अणि जुन्या गोष्टी सांगतात. नवसुबाबानी एक जुनी गोष्ट सांगितली. त्याचा बाबा बाळू बरफ तेंव्हा गावचा पाटील होता. (म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ). लोकांनी माउलीच्या दात्याला (म्हणजे कड्याखाली) खडान लावली. तिथल्या वहळात अमाप पाणी होतं. कधी नव्हे इतकी भरमसाट मच्छी गावली. प्रत्येक कुटुंबात दोन दोन किलो तरी मच्छी आली असेल. पण बाळू बाबा अणि गावातले इतर जाणते डवरे काळजीत पडले. (डवर  म्हणजे वृद्ध, झाड डवरले म्हणजे समृध्द झाले, तसे माणूस म्हातारा झाला कि त्यालाही वारली ‘डवर’ म्हणतात.) 
हे डवरे काळजीत पडले, कारण आपल्याला गरज नाही एवढी मच्छी आपण पकडून आणली. आता जंगलातली माउली कोपेल. संध्याकाळ झाली तसे एक आक्रीत घडले. कधी नव्हे तो गावाच्या वेशीवर येउन तरस ओरडू लागले. त्यांच्या भेसूर आवाजाबरोबर जंगलातून स्त्रीच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. गावातल्या सर्व तीस घरातले लोक पाटलाच्या घराशी भिऊन गोळा झाले. तरस गावात शिरू नयेत म्हणून बाजूबाजूने जाळ पेटवला. पाटील, भगत, आणि डवरे  एकत्र बसले. माउलीची इच्छा समजून घेतलॆ. सर्व घरांमधून जास्तीची मच्छी गोळा केली. टेंभे घेतलेले तरुण आणि पाटील व भगत ती सर्व मच्छी घेऊन ताबडतोब निघाले आणि त्याच वहळात पुन्हा सोडून आले. वेशीवरच्या मखराशी त्यांनी वाघदेवाची क्षमा मागितली, त्याला त्याचा हिस्सा दिला. मग एक तासाने ते तरस निघून गेले आणि रडण्याचे आवाजही थांबले. 
ही गोष्ट तिथे जंगलातल्या माळावर पडून मी ऐकत होतो. तेंव्हा तिथे दूर अंतरावर विजेचे दिवे होते, चार लोकांचे मोबाईल होते. जेंव्हा यातले काहीच नव्हते. हे किर्र अंधारे जंगल होते. आणि माणसं  त्या अंधाराशी झुंजून आणि जुळवून राहत होती, तेंव्हाची गोष्ट मला नवसूबाबा सांगत होता. जीव राखणं ही तर प्रत्येक जीवाची प्राथमिक प्रेरणा असते. जेंव्हा जीवाची भीती असते तेंव्हा माणसं कशी घट्ट  एकत्र येतात हेच मी नवसुबाबाच्या गोष्टीतून ऐकत होतो. 
आदिवासी गावात सामुहिक जगणे अजून तरी टिकून आहे. संकटात आणि सुखातही गाव एकत्र असते. पण यातले युगांतर आमच्या डोळ्यासमोर घडताना दिसते आहे. मे महिन्यातली लग्ने आठवतात… 
गावात कुणाच्या घरी लग्न असले, की गावातल्या सर्व घरच्या मुली त्या घरी पाणी भरायला जातात. कोणी कुणाला हे सांगावे लागत नाही.  आत्ताच एका प्रतिष्ठित घरातले लग्न झाले. त्यांनी सरळ मोटर लावून पाणी भरले. आपल्याला नको कोणी मदतीला यायला! लग्नघरी रोज रात्री गावातल्या सर्व स्त्रिया गाणी म्हणायला जमतात. त्या गाण्यांमधून “जनरल संसार कसा करावा” पासून “पलिकडच्यांची चेष्टा” असे विषय असतात. अशी गाणी म्हणायला स्त्रिया आपणहून येतात. लग्नात सर्व जण सहभागी होण्याची ती एक खूण असते. गावातले एक दुकानदार आहेत, त्या दुकानदारीण बाईंचा तोरा गावातल्या काही बायांना रुचत नाही. त्यामुळे त्यांच्याकडच्या लग्नात कोणी गायला जाईना. त्यांनी पैसे देऊन बायांना बोलावले. मग काही बाया आल्या. नंतर दुसरे एक लग्न आले, ते साधारण घरातले होते. पण तिथेही बायांना पैसे हवे होते. आमच्या गावातल्या ‘सहकारी’ उपक्रमाचे अशा रीतीने ‘व्यवसायीकरण’ (खरे तर monetisation)  झाले. ग्राम सभेने ठराव केला, लग्नातले मान-पान बंद! जर कोणी मान-पान केलेच तर ५००० रु दंड! गावातल्या एका बड्या धेण्डाने हा ठराव धाब्यावर बसवला. तो म्हणाला, मी ५००० दंड भरीन, मला ही रक्कम किरकोळ आहे. पण मी मान पान करणारच. माणसाच्या सामाजिकपणाची एक गरज यंत्राने संपवली अणि दुसरी गरज पैशाने संपवली. 
लग्नात बेन्जो पार्टी बोलावणे अणि त्यावर नाचणे हे तर अगदी कॉमन आहे. त्यात नाचताना लोक पारंपरिक पद्धतीने नाचत नाहीत. मुंबईत गणपतीत कसे, एकटेच एक हात वर करून आपल्याच तंद्रीत नाचतात, तसे हे नाचतात. असे नाचताना लोक एका झुंडीत असतात, पण एकत्र नसतात. एकाच्या नाचण्याचा दुसर्याशी संबंध नसतो. सगळे एकेकटे असतात. धुंद असते, पण एकट्याची.  
माळावर निशब्द रात्री ऐकलेल्या रवाळितल्या नाचाची आठवण येते. तिथले “देव अंगात येणे” हा मानसिक अनुभव सुद्धा सामुहिक असतो, आणि इथे फिल्मी गाण्यांवर आनंद घेतानाही प्रत्येक जण हळू हळू एकटा  होत असतो.
बा एल्विना, माणसाला जगण्यासाठी समाजाची गरज असते, तोपर्यंतच तो सामाजिक प्राणी असतो.… ८० वर्षांपूर्वी तुला हे कळलेही असेल, पण वळले नव्हते. काळाचा गीअर पडायला, युगांत व्हायला एवढा वेळ लागतोच. 
– मिलिंद थत्ते 
Advertisements

9 thoughts on “गरजेपुरता सामाजिक

Add yours

 1. Milind, As usual chan lihilays. Manushya prani sodla tar Saglech prani garaj asel tewdhech ghetat..Nisargachi hani karit nahit.. te nisarga chakrachach 1 bhag astat… Apan manav ch fakt nisarga kadun orbodtoy ani saglya nisarg chakracha samtol ghalwun bastoy… Khar tar, prattekane jewdhe hawe tewdhech nisarga kadun ghyaycha yatn kela tar? Office madhe baghto, ugachach prattek padarthala kagdi dishes ghene, toilet madhe awwa chya swaa tissue paper waparne, pani tar vicharucha naka ek wegla wishay hoil hbolnyacha, saglikade deepotsav karun electricity jaalne asha anek sawayi aplyala khol gartet gheun jatahet… welich bhanawar nahi alo tar aplya saglyanach janglat jaun revalya karawya lagtil yat shanka nahi..

 2. Really Good Milind as expected.
  Can you wirte some article on” Vikas “( Development ) that will be really useful and I am sure it will start Good disdscussion also.
  I am very enriched with all the comments above .

  Ajinkya

 3. मी सहसा अशा विषयावर लिहित नाही असे तू मेल मध्ये लिहिले आहेस. का नाही लिहित तू? अनेक लोक अनुभवविहीन कल्पनाविलास आणि तर्कचापल्याच्या आधारावर विपुल लेखन करतात. तर डोळसपणे घेतलेल्या तुझ्या बावनकशी अनुभवांना ही वाट मिळाली तर ती अनेकांना नवी दृष्टी देईल, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

  मागे फादर वॉलेस यांचा एक लेख वाचला होता, त्याची या निमित्ताने आठवण झाली. लेखाचे शीर्षक होते वॉकमन. उपलब्ध सोयी-सुविधा, आणि वैज्ञानिक प्रगती यांच्यामुळे माणसाला असे वाटू लागले आहे की माझ्या कामासाठी, मनोरंजनासाठी, गतिविधींसाठी मला अन्य कुणाची गरज नाही. माणूस समाजापासून तुटत चालला आहे त्याचे हे नक्कीच महत्वाचे कारण आहे.

 4. ताराबाई मोडकांची शिक्षण पध्दती पुढे चालविणाऱ्या सिंधूताई अंबिके आदिवासी गाणी गोळा करत असत तशा मुलांसाठी गाणी लिहून,चाली लावून शिकवत असत.त्यांनी सांगितलेली आठवण.शाळेत-शिबिरात येणारी मुलं त्यांच्याच समाजातली गाणी म्हणायला कंटाळू लागली.अधुनीक चित्रपट संगीताची (तालाल महत्व देणारी,नाटायला लावणारी आयटम सॉंग सारखी गाणी) मोहिनी चढली त्यांच्यावर.मग सिंधूताईंनी त्या चाली वापरून मुलांच्या जगातले शब्द त्यात बसवले आणि ती गाणी मुलं आवडीनं म्हणू लागली,पाठही लवकर झाली.हे चांगलं का वाईट कसं ठरवणार असंही त्या खेदानं म्हणाल्याचं आठवतं..

 5. आधुनिकीकरणामुळे काय लयाला जातंय ह्याची नोंद करण्याचा मिलिंद थत्ते ह्यांचा प्रयत्न उत्तम आहे. त्यांचा ब्लॉग वाचला आणि दोन किस्से आठवले.

  नागालँडच्या तुएनसांग जिल्ह्यात 2005 साली गेलो होतो. एका गावाच्या हद्दीत एक भली मोठी गुंफा वा कपार होती. त्यामध्ये मधमाशांची पोळी. गावातील कुटुंबानुसार त्या पोळ्यांची वाटणी झाली होती. प्रत्येक कुटुंब आपल्या वाट्याचं पोळं एवढंच कापायचं की त्यातून कुटुंबाला पुरेसा मध मिळावा. नेमकं विज्ञान माहीत नाही पण मधमाशा पुन्हा त्याच जागी पोळं बांधायच्या. त्यामुळे माणसांचीही सोय व्हायची आणि मधमाशांचीही.
  त्सुनामीनंतर माझा मित्र हेमंत बाबू अंदमान-निकोबारला गेला होता. स्थानिक आदिवासींसोबत तो मासेमारीला गेला. एका लगूनमध्ये (समुद्रतळ्यात) ते होडीने गेले. काही वनस्पती विखरून टाकली. ती खाल्ल्यावर मासे तरंगू लागले. प्रत्येकाने आपल्याला हवे तितके मासे घेतले. दोन, चार, सहा असे. बाकीचे मासे तसेच तरंगत होते. एवढेच मासे हवे होते तर विष टाकून कशाला एवढ्या संख्येने मासे मारायचे, हेमंतने विचारलं. तर ते हसायला लागले. ते म्हणाले ते मासे मेलेले नाहीत फक्त बेशुद्ध झाले आहेत. आपली होडी बाहेर जाईपर्यंत पुन्हा शुद्धीवर येतील. हेमंतने हातातला मासा पाण्यात टाकला. तर बेटा चपळाईने नाहीसा झाला खोल पाण्यात.
  ही खरी अन्न सुरक्षा.

  1. Thank you, Sunil.

   – मिलिंद Milind
   +91 9421564330 / 8879330774
   At Kogda Patilpada, Po. Kogade
   Taluka Jawhar, Dist. Thane 401603
   Vayam वयम् – आपल्‍या विकासाची आपली चळवळ
   On forests and people

  2. मूळचा लेख आणि आपली प्रतिक्रिया दोन्हीत छान उदाहरणं आहेत.
   वाचल्यावर वाटलं की, ह्या विषयातला समान धागा वैपुल्याचा आहे का….? की माणसाच्या आंतरिक सुरक्षिततेच्या भावनेचा आहे…..? मानवसमुह छोटा होता तेव्हा निसर्गातलं वैपुल्य ओरबाडण्याची त्याला तातडीची निकड भासली नाही. वाढत्या संख्येबरोबर गरजेपुरतं मिळेलंच ह्याची हमी जसजशी कमी होत गेली – आणी होत जाणार – तसतशी असुरक्षितता वाढून संघर्षही वाढला आणी वाढणार.
   म्हणून, उपलब्ध साधनं आणी त्यांची मागणी ह्यांचं व्यस्त प्रमाण हा विषय न सोडवता, सामूहिक जगणं कमी कसं होत चाललंय असं भावनिक रूप काहीच उपयोगाचं नाही.
   ह्या उदाहरणांमध्ये असलेला मर्यादित समुदाय संख्येने वाढल्यावर असाच वागेल….?

 6. तारपा नाचताना लोक हातात हात गुंफून एकत्र नाचतात… आणि DJ/ बेन्जो पार्टी वर नाचताना एकाकी .. हा सांस्कृतीक बदल खरच खेदजनक आहे.. आम्हाला तर कधीच अस एकत्र काही करता आला नाही… तुम्हाला निदान काही सुंदर गोष्टी तरी गावात एकरूप होऊन जगताना अनुभवता येतायत…

 7. छान लिहिलंयस. आत कुठे तरी तुटतं वाचताना. एक आठवण सांगतो लहानपणीची… आमच्या इमारतीत एचएएलच्या क्वार्टर्स होत्या. त्या लोकांच्या बदल्या सतत होत असत. त्यामुळे ज्यांच्याशी काही ऋणानुबंध निर्माण झालाय अशा कोणी घर सोडून अन्यत्र जाण्याचे प्रकार बरेचदा घडत. सुरुवाती सुरुवातीला आमच्या वयाची सारी मुलं अशा दूर जाणाऱ्याच्या घरातलं सामान हलवण्यापासूनमदत करू लागत. त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत त्यांच्या गाडी मागे जात.. हे सारं केव्हा थांबलं काही कळलंच नाही. आज तुझा लेख वाचला आणि एकदम आठवलं.

  Date: Fri, 8 Nov 2013 14:12:41 +0000
  To: abhijit.mulye@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: