आपल्‍या उबुण्टूचे काय?

आफ्रि‍केतल्‍या एका गोर्‍या पाहुण्‍याने सांगितलेला एक किस्‍सा आहे. एका गावातल्‍या मुलांना तो म्‍हणाला, तुमच्‍यापैकी कोण वेगात धावतो बघू. इथून त्‍या झाडापर्यंत धावायचे, जो पहिला तिथे पोचेल त्‍याला मी बक्षीस देईन. ती सर्व पोरे धावली पण एकमेकांना सोबत घेऊन. जो मागे पडला, त्‍याला बाकीच्‍यांनी हात धरून पुढे नेला. त्‍या झाडाशी सगळे एकत्र पोचले आणि मग त्‍यांनी जल्‍लोष केला. पाहुणा या प्रकाराने थक्‍क झाला. तिथल्‍या थोरांनी पोरांचे वागणे समजावून सांगितले. ‘उबुन्‍टु’ हे त्‍यांचे तत्‍त्‍व होते. उबुन्‍टुचा अर्थ आहे, ‘आम्‍ही सारे आहोत म्‍हणून माझे अस्तित्‍व आहे’ (आय अॅम बि‍कॉज् वी आर).

आपण शाळेत काय शिकतो? एकमेकांना आपण गणित कसे सोडवले हे दाखवू नका, आपली चित्रांची वही सुध्‍दा दाखवू नका. परीक्षेत नेमके कोणत्‍या भागावर काय प्रश्‍न येणार हे जर आधी समजले तर कोणाला सांगू नका. सगळे एका दिशेला तोंड करून बसा. एकमेकांशी बोलू नका. तू एकटाच पहिला आला पाहिजेस. जो पहिला येणार नाही, तो कमनशिबी, त्‍याचे आयुष्‍य कुचकामी. आपण पुढे जाणे, बाकीच्‍यांचा विचार न करणे. तू तुझं तुझं बघ.

शाळेत असे शिकून आपण पुढे जातो. नोकरीसाठी मुलाखती, परीक्षा, स्‍पर्धा असे सगळे करतो. एकटे एकटे. सगळ्यांना मागे टाकून पुढे जातो. आणि मग पळत्‍या गाडीच्‍या मागे लागलेल्‍या कुत्र्यांसारखे होते. त्‍या गाडीपर्यंत पोचल्‍यावर कुत्रे गोंधळतात, तसे आपले होते. सगळ्यांना मागे टाकून जिंकल्‍यावर ते जिंकणे कुणासाठी हेच कळेना होते.

असेच शिकलेली माणसे सरकारात बसतात. नागरिक म्‍हणून सरकारच्‍या दाराशी तिष्‍ठत राहणारेही हेच शिकलेले असतात. पाडगावकर उदासबोधात म्‍हणतात तसे ‘एक हात गांडीवर ठेवून दुसर्‍या हाताने सलाम’ ठोकतात. मागून लाथ बसू नये या काळजीने हात तिथे ठेवायचा, समोर झुकायचे. अनेक शासकीय अधिकारी आपल्‍या खालच्‍या कर्मचार्‍यांवर सतत डाफरत असतात, तोंडाचा पट्टा चालत असतो, अपमानाचा बोनस वाटत असतात. हेच अधिकारी त्‍यांच्‍या वरचा अधिकारी आला, की इतके वाकतात की यांना कणा आहे यावर विश्‍वासच बसू नये. यांचे असे का होते? यांना दोन्‍ही वेळा मृदू आणि ताठ का राहता येत नाही? कारण त्‍या व्‍यवस्‍थेची घडण आणि माणसांचीही घडण ब्रिटीश राज्‍यात असल्‍यासारखी झाली आहे. एकट्याने पुढे जायचे आणि बाकीच्‍यांना दाबायचे. चळवळीचा कार्यकर्ता म्‍हणून सतत शासनाशी संबंध येतो त्‍यामुळे मला हे उदाहरण स्‍पष्‍टपणे द्यावेसे वाटले. इतके बटबटीत नसेल, पण अशीच नाती कॉर्पोरेट जगातही असतात. मग तिथे टीम बिल्‍डींग, ट्रस्‍ट बिल्‍डींग अशी ट्रेनिंग घ्यावी लागतात. कारण धंद्यावर नफ्यावर माणसांच्‍या आपापसातल्‍या बिघडलेल्‍या नात्‍यांचा परिणाम होत असतो. शासनाच्‍या धंद्यावरही असा परिणाम होतच असतो. चोरांची सद्दी वाढते त्‍यात आपापसात आणि जनतेशी वागण्‍याच्‍या या पद्धतींचा मोठा भाग आहे. म्‍हणूनच लोकाभिमुख शासन करायचे, तर ही वृत्‍ती हळू हळू का होईना बदलणे भाग आहे.

खासगी धंदेवाईक जसे नफ्यासाठी कर्मचार्‍याची प्रेरणा टिकवण्‍याचे, त्‍याला आपली कंपनी ‘आपली’ वाटण्‍याचे, कंपनीचा नकळत अभिमान वाटू लागेल असे अनेक प्रयोग करत असतात. यात नकळत ‘आपण सारे एकत्र पुढे जाऊ’ हीच भावना रूजवण्‍याचा प्रयत्‍न असतो. मॅक्‍सम्‍यूलर भवन या जर्मन शिक्षण संस्‍थेत शिकताना आमच्‍या वर्गात हॉटेलातल्‍या सारखी गोल टेबले आणि त्‍याभोवती चार-पाच जण अशी बसण्‍याची रचना असे. सर्वांनी मिळून, एकमेकांचे पाहून, एकमेकांना मदत करून शिकायचे अशीच तिथली रीत होती. दुसर्‍याला मदत करताना आपला विषय अजून पक्‍का होतो, अशी त्‍यांची धारणा होती. ‘विद्याधन दिल्‍यामुळे वाढते’ असे आपण फक्‍त सुभाषितात म्‍हणतो, आचरणात आणत नाही.

आपल्‍या देशातला बहुसंख्‍य वर्ग अजूनही एकाच दिशेला तोंड करून ‘एकमेकांना मदत करू नका’ असे घोषवाक्‍य असलेल्‍या शिक्षणव्‍यवस्‍थेत तयार होतो आहे. शासन या एकाच इंडस्‍ट्रीशी या वर्गाचा संबंध येतो आहे. त्‍यांच्‍या आकांक्षाही ‘एकट्याने पुढे जाणे हाच पुरूषार्थ’ अशा आहेत. पूर्वी धर्माच्‍या कामात सर्वजण एकत्र येत. तिथे आपपरभाव बाजूला ठेवला जाई. राजस्‍थानात मोठमोठे तलाव लोकांनी बांधले. तलावाच्‍या कामात लागणारी कौशल्‍ये वेगवेगळ्या लोकांकडे विभागलेली होती, त्‍यांचा मान लोकांनी ठेवला. पिढ्यान् पिढ्या हे तलाव स्‍वच्‍छ राखले. त्‍यातल्‍या पाण्‍यावर गावांचे जीवन वाळवंटातही सुखाने चालले. या तलावांच्‍या काठावर देव बसवलेले आहेत. जणूकाही हे देवानेच बांधले. ‘तेरा तुझको अर्पण’ अशी भावना आरतीत व्‍यक्‍त केली जाते, ती लोकांनी प्रत्‍यक्षात आणली. स्‍वतःचा मोठेपणा केला नाही. असे देवाच्‍या नावावर असणारे पण लोकश्रमाने बांधलेले तलाव कोकणात, गोव्‍यातही आहेत.

अशा कामांसाठी ज्‍यांनी धन दिले, ज्‍यांनी माती वाहिली, ज्‍यांनी छिन्‍नी चालवली त्‍यांची नावे लिहीलेली नाहीत. आता गणेशोत्‍सवात मोठ्ठे होर्डिंग लावून त्‍यावर नमस्‍कार केलेला फोटो लावण्‍याची पद्धत आहे. तिथेही ‘मी’ हा देव बसवला असे त्‍या बापड्या देवाला आव्‍हान देणारी बीभत्‍स जाहिरात असते. ज्‍यांना एवढा मोठा पुरूषार्थ जमत नाही, ते देवतलावात निर्माल्‍याची प्‍लॅस्‍टीकची पिशवी टाकून धर्माचे काम काढत असतात. स्‍वामी विवेकानंद म्‍हणत, ‘ज्‍या देशाची जी प्रकृती त्‍यातूनच त्‍या देशाला इतर गोष्‍टी शिकवाव्‍या लागतात. इंग्रजांना जसा धर्मही व्‍यापारातून समजावा लागतो, तसे आपल्‍याकडे शास्‍त्रही धर्मातून शिकवले जाते.’ आपल्‍याकडे असणार्‍या उबुण्टूची जागा अशी वरकरणी धार्मिक कामांमध्‍ये होती. आपण ती घालवली आहे.

पूर्वी कुटुंबाचा एक फोन असे. तोही आता गेला आहे. सर्वांची तोंडे आणि रेंज वेगवेगळ्या दिशेला अशी आपली कुटुंबे आहेत. ‘अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्’ (हा माझा तो परका असा भेद कमी बुध्‍दीचे लोक करतात, उदार मनाच्‍या लोकांना मात्र सारी धरती हेच एक छोटे कुटुंब वाटते) – ही थिअरी आपल्‍याला पाठ आहे, पण प्रॅक्‍टीकलमध्‍ये मात्र घटते गुण आहेत. जे आपल्‍यापुरतेच बघतात त्‍यांना कमी बुध्‍दीचे न मानता आपण रोल मॉडेल मानतो आहोत.

जगाचे कल्‍याण, पर्यावरणाचे जतन, भारतीय संस्‍कृतीचा ठेवा – या सगळ्या गोष्‍टी गेल्‍या समजा तेल लावत. पण नफ्याच्‍या मागे धावताना सुध्‍दा एकेकटे पुढे जाणे परवडत नाही. तरीही आपण असे का वागतो?  आपल्‍या उबुण्टूचे काय?

– मिलिंद थत्‍ते

(पूर्व प्रसिद्धी – लोकमत मंथन 2015)

Advertisements

सर्वेपि सुखिनः – प्रॅक्टीकल!

आमच्या भागातल्या काहीच जाती काही विशिष्ट जनावरे खातात. अमुक प्राणी किंवा पक्षी अमुक कुळातल्या लोकांना वर्ज्य असतो. काही कुळांना एखादी वृक्ष प्रजाती वाचवण्याची जबाबदारी असते. थोडं हिंडून पाहू गेलं, तर देशात सर्वत्र अशा रीती दिसतात. झारखंड मधल्या संथाल जमातीत प्रत्येक गोत्राचे स्वामी एखादे झाड किंवा पशु आहे. त्या त्या गोत्राने त्या जीवाचे रक्षण करायचे अशी रीत आहे. जिथे शेती करणारे आणि शिकार करणारे समूह एका क्षेत्रात राहत आले, तिथे कोणी कशाची शिकार करावी याचेही संकेत रूढ झालेले होते. नदीजवळच्या सपाट भागात आणि मंद उतारावर कुणबी शेती करत. तर उंचावरच्या डोंगराळ भागात फिरते गवळी आपल्या गाई-म्हशी चारत. गवळी शिकार करत नसत. कुणबी मात्र शिकार करत. शिकार केलेल्या मांसावर त्यांची प्रथिनांची गरज भागत असे. तर गाडगेभर ताक पिऊन गवळ्यांना प्रथिने मिळत. गवळी दूध आणि तूप विकत आणि त्याबदल्यात कुणब्यांकडून धान्ये–डाळी घेत. कोणती संसाधने कुणी वापरायची याची रूढ व्यवस्था होती. दोघांचे परस्परावलंबन आणि दोघांच्याही गरजा भागण्याची सोय होती.
कनार्टकातल्या अघनाशिनी नदीतले एक बेट आहे – मसूरलुक्केरी. या बेटावरच्या समाजव्यवस्थेबद्दल 1883च्या गॅझेटमध्ये काही उल्लेख आहेत. आणि 1984 साली अभ्यास करणाऱ्या संशोधकांनाही यातल्या अनेक गोष्टी अजूनही प्रचलित आहेत असे लक्षात आले. या बेटावर 13 जातींचे लोक होते. अम्बिगा ही मासेमारी करणारी जात होती. हाळक्की, पटगर, आणि नाईक या तीन शेती करणार्या जाती होत्या. यांपैकी नाईक हे सैनिकी आणि पाटीलकीही करत. हविक ही ब्राह्मण जात होती. हे फळबाग शेती करण्यात मुरब्बी होते. देशभंडारी हे देवळात नृत्य-गायन करणारे लोक होते. भंडारी ताडी काढायचा व्यवसाय करत. कोडेया हे न्हावीकाम तर मदिवाळ हे धोबीकाम करत. शेट हे सोनार, अचारी हे सुतार व लोहार, मुखरी हे पाथरवटाचे (दगड घडवण्याचे) काम करत. गौड सारस्वत ब्राह्मण हे व्यापारी होते. या सर्व तेरा जातींपैकी हविक सोडले, तर इतर सर्व जाती मांसाहार करत. पण शेट, कोडेया, आणि गौडसारस्वत हे स्वतः शिकार किंवा मासेमारी करत नसत. ते इतरांकडून मासे व मांस रोखीवर किंवा वस्तूविनिमयावर खरेदी करत. इतर नऊ जातींपैकी फक्त अम्बिगा हे निव्वळ मासेमारी करत. बाकी सर्व फावल्या वेळात किंवा स्वतःला खाण्यापुरती मासेमारी करत. या सर्व जातींचे मिळून मासेमारी आणि शिकारीची 33 प्रकारची तंत्रे होती. तंत्रे वेगवेगळी असल्यामुळे निसर्गाच्या वेगवेगळ्या हिश्श्यात आणि वेगवेगळ्या जीवांची शिकार हे करत. एकमेकांच्या पायावर (किंवा पोटावर) पाय येत नसे.
खोल पाण्यात नावा नेऊन आणि मोठी जाळी टाकून मासेमारी करणे हे फक्त अम्बिगा करत. त्यात तेच वाकबगार होते. मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार फक्त हाळक्की करत. वाघळे आणि इतर काही पक्षी सापळे लावून पकडणे पटगर आणि मदिवाळांना जमे. फक्त नाईक सापळे लावून जमिनीवर वावरणारे छोटे प्राणी धरत. उथळ पाण्यात उतरून उजेड पाडून मासे पकडणे हे काम अचारी करत. आपली साधने तयार करण्यासाठी ही मंडळी जी झाडे वापरत तीही वेगवेगळी होती. हाळक्की जाळी विणताना शिंदीच्या धारदार झावळ्यांची विणत, तर पटगर उथळ पाण्यातल्या एका गवतापासून जाळी तयार करत. सर्वांची अन्नाची गरज भागेल आणि निसर्गातल्या कोणत्याच एका घटकावर कमालीचा ताण येणार नाही – अशी काळजी घेणारी ही व्यवस्था होती.
दक्षिण महाराष्ट्रात तिरूमल नंदीवाले, वैदू, आणि फांसेपारधी या तीन भटक्या समुहांच्या शिकारीच्या पद्धती पाहिल्या तरी त्यात असेच समतोल विभाजन दिसून येते. फांसेपारधी हे निव्वळ शिकारी, तर बाकी दोघे इतर उद्योग असलेले पण पोटासाठी थोडीफार शिकार करणारे. तिरूमल नंदीवाल्यांच्या घरात शिकारीला सोबत येणारे चार कुत्रे, आणि तेही माग काढण्यापासून झडप घालण्यापर्यंत सगळेच करण्यात तरबेज. शिकार करायचे प्राणी – तरस, वाघटी, रानडुक्कर, ससा, आणि साळिंदर. वैदूंच्या सोबत एखादाच कुत्रा. आणि शिकार करायची मुंगूस, ताडमांजर, मांजर, आणि इतर छोट्या मिश्राहारी प्राण्यांची. सापळ्यात एखादी खार ठेवून या प्राण्यांना अडकवण्याचे त्यांचे तंत्र होते. उलट फांसेपारध्यांकडे कुत्रे अजिबात नाहीत. फास, सापळे लावून शिकार धरायची. आणि पोटासाठी शिकार विकायचीही. पूर्वी म्हणे ते प्रशिक्षित गाय वापरायचे शिकारीत मदतीसाठी. हरणांच्या कळपात ही गाय सोडायची आणि तिच्या आडोशाने सापळे रचत जायचे. फांसे लावून तितर, लावरी, मोर असे पक्षी ते मोठ्या प्रमाणात पकडत. या तीन शिकार्यांच्या पद्धती वेगळ्या आणि त्यामुळे त्यात मिळणारे प्राणीही वेगळे. यात नीट पाहिले तर फांसेपारधी हे सर्वात कुशल शिकारी. त्यांना वैदूंसारखे खारीचे सापळे लावणे सहज जमले असते. पण त्यांनी ते कधी केले नाही. जे दुसर्याचे आहे ते आपण कशाला घ्यायचे, ही एक सहज आणि सामान्य भावना होती.
‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ ची ही प्रत्यक्षातली आवृत्ती होती. ‘प्रत्यक्षातली’ म्हणताना ती बिनचूक नव्हती हे तर उघडच आहे. माणसाने निर्माण केलेल्या रचनांमध्ये त्रुटी असणारच.  याही रचनेतली सत्ताधारी मंडळी आपल्याला अधिक फायदा व्हावा अशी व्यवस्था करत असणारच. पण तरीही कागदाचा वा कायद्याचा वापर नसलेली आणि काही शतके चाललेली अशी ही प्रभावी रचना होती.
स्थिर शेती सुरू झाल्यापासून आपल्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेणे माणसाला जमू लागले. शेती वाढली तशी अन्नधान्य स्वतः न पिकवता विकत घेणारी शहरेही वाढली. भोवती शेती आणि मध्ये शहरे ही रचना अशीच निर्माण झाली. शहर म्हणजे कमी कष्टाचे जीवन ही स्थिती मग ओघानेच आली. आपल्याला काही कमी पडू नये अशी काळजी प्रत्येक जीव घेतोच. शहरांना गावांच्या अंतर्गत रचनेशी काही घेणेदेणे नव्हते. आम्हाला काही कमी पडू नये म्हणजे झाले. शहरांचा आकार वाढला, तसे स्वतः न पिकवणारी माणसे वाढली. कुटुंबात खाणारी तोंडे जास्त आणि कमावणारे हात कमी असे झाल्यावर जे होते तेच व्हायला लागले. तिकडे गावातल्या परस्परपूरक रचनेचाही तोल ढासळू लागला. जंगल आकुंचित व्हायला लागले, शेती वाढायची तेवढी वाढली, भटक्या जमातींसाठी पोट भरण्याचीही जागा उरली नाही. त्यांचे व्यवसाय तर नामशेष झालेच. जंगल आणि शेतीवर भागत नाही अशी गावांची स्थिती झाली.
या ढासळणीतून आपण मार्ग कसा काढणार? ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा एकच डार्विन सिद्धांत आपल्या डोक्यात शिल्लक आहे. डार्विनने निसर्गात परस्परपूरक आणि सहाय्यभूत होणारी कामे जीव कशी करतात हेही सांगितले आहे, पण त्याकडे आपल्या मेमरीत उरलेले नाही. सर्वैपि सुखिनः सन्तु, जो जे वांछील तो तो लाहो वगैरे सगळी वानगी आपण पुराणातली म्हणून टाकून दिली आहेत.
परस्परपूरक समाज आणि निसर्ग हे आताही शक्य आहे. नवयुगाच्या नवीन रचनांचे सृजन त्यासाठी करायचे आहे. तसे घडतेही आहे. आपण फक्त आपल्या सततच्या अपग्रेडिंग् च्या धबडग्यातून श्वास घेण्यापुरता वेळ काढला पाहिजे. मग आपणही त्या सृजनात सामिल होऊ.
– मिलिंद थत्ते

पैशाची भाषा

‘बाळ, खूप शीक, मोठा हो’ – असा एक आशीर्वाद दिला जातो. यात असे गृहीत असते की खूप शिकल्‍याशिवाय माणूस मोठा होत नाही. त्‍यातही शिकणे म्‍हणजे बुकं शिकणे असेच गृहीत असते. खूप पुस्‍तकी विद्या मिळवलेला माणूस मोठा असतो असे नकळत मनावर बिंबत असते. अशी अनेक गृहीतके संस्‍कृतीसोबत येत असतात. यातच खूप पैसा मिळवलेला किंवा मिळवू शकणारा माणूस म्‍हणजे सुखी-समृद्ध माणूस असेही एक गृहीतक आहे. पैशाने समृद्धी येते यात खोटे काहीच नाही, पण हेच एक सत्‍य आहे असे मानणे मात्र फसवे आहे.

काळानुरूप समृद्धीचे स्रोत आणि कल्‍पनाही बदलत असतात. मौर्य काळात राजाही गाई पाळत असे, त्‍या चारण्‍यासाठी जंगलाचा एक तुकडाही राखून ठेवलेला असे. महाभारतातली एक लढाई विराट राजाच्‍या गाई शत्रूने पळवण्‍यावरून झाली होती. ‘गोधन’ फार महत्‍वाचे मानले जात होते. जव्‍हार संस्‍थानच्‍या राजाच्‍या गाई हातेरी गावच्‍या सात विहीरींवर पाणी पिण्‍यासाठी यायच्‍या, असे हातेरीतल्‍या म्‍हातार्‍यांच्‍या आताही आठवणीत आहे. इतका काळ गोधन टिकले. जमीन हेही कृषी संस्‍कृतीच्‍या काळात मोठेच धन होते. राजांनी वेतन देण्‍याऐवजी इनाम जमिनी देणे हे मुघलांपासून ते आदिवासी राजांपर्यंत सर्वांच्‍या राजवटीत दिसते. आताही जमीन हे धन आहेच, पण ते एन्ए (अकृषि) झाल्‍यानंतर! सोने, चांदी आणि रत्‍ने यांचा धन आणि माध्‍यम या दोन्‍ही प्रकारे वापर झाला. सोन्‍याचांदीला स्‍वतःचे मूल्‍य होते, पण त्‍यानंतर चलनाची कल्‍पना आली. नोटा आल्‍या, हलकी नाणी आली. नोटेच्‍या कागदाची किंमत त्‍यावर छापलेल्‍या रूपयांपेक्षा खूपच कमी असते. नोटेला किंमत असते ती त्‍यावर छापलेल्‍या वचनामुळे – ‘‘मैं धारक को सौ रूपये का मूल्‍य अदा करने का वचन देता हूँ’’. सरकारने त्‍या मूल्‍याचे सोने ठेवून हे वचन छापलेले असते. हे वचन म्‍हणजेच आता धन मानले जाते.

tab_b 650याही काळात काही लोक या वचनाच्‍या भानगडीत पूर्ण अडकलेले नाहीत. आमच्‍या गावातली एक म्‍हातारी आहे. तिने पाळलेल्‍या कोंबड्या ही तिची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक कशी वाढवायची हे तिला चांगले माहीत आहे. जेव्‍हा जेव्‍हा तिला पैशांची गरज असते, ती एखादी कोंबडी विकते. पैसे तिला पाहिजे तसे ती खर्च करते, मौज करते. एक शेतकरी आहे, त्‍याने मागच्‍या दोन वर्षांपासून आलेला सगळा भात साठवून ठेवला आहे. तीन कणग्‍या भरलेल्‍या आहेत. औंदा सुरणही भरपूर लावून ठेवला आहे. पुढच्‍या वर्षी पोराचे लगीन करायचे आहे. सुरण आणि एक कणगी भात लग्‍नातल्‍या गावजेवणासाठी आहे. एक कणगी मुलीच्‍या बापाला देज म्‍हणून देण्‍यासाठी आहे. आणि एक कणगी विकून इतर खर्च भागवायचा आहे. माणसाला ज्‍या ज्‍या गुंतवणुकीत गती असते, तिथेच तो गुंतवणूक करतो. या लोकांचा बँक आणि त्‍यात आपोआप वाढणारा पैसा यावर विश्‍वास नाही. भात आणि कोंबडी ही त्‍यांना पिढ्यान् पिढ्या माहीत असणारी संपत्‍ती आहे. ती कशी सांभाळावी, वाढवावी हेही त्‍यांना चांगले कळते. एखाद्या बाईला कांदे हवे असतात. पैसा कमावण्‍याचे साधन तिच्‍याकडे नसते. मग ती जंगलात जाते. कहांडोळीचा किंवा धामोडीचा डिंक काढते. हा डिंक पळसाच्‍या पानात गुंडाळून आठवडी बाजारात जाते. तिथे या डिंकाच्‍या चारपट वजनाचे कांदे तिला डिंकाच्‍या बदल्‍यात मिळतात. एखादा शिकलेला माणूस तिला वेड्यात काढतो. म्‍हणतो चार किलो कांदे म्‍हणजे साठ-सत्‍तर रूपये आणि एक किलो डिंक म्‍हणजे किमान तीनशे रूपये. बाईला सौदा कळला नाही. बाई म्‍हणते मला कुठे रूपये पाहिजे होते, मला कांदे पाहिजे होते ते मिळाले! अशाच प्रकारे तिला डाळ आणि मीठसुध्‍दा मिळते. पैशाच्‍या भाषेत भाषांतर केले तर हे शोषण आहे. रुपयामधला पगार डॉलरात बदलला की कमी वाटतो तसेच आहे हे. रूपयात कमावणारा माणूस डॉलरमध्‍ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. तसेच काहीसे डिंक, कोंबडी, भात या चलनात कमावणार्‍या माणसांचे झाले आहे. त्‍यांच्‍याच जगात ते राहिले तर ते श्रीमंत आहेत, आणि पैशाच्‍या जगात आले तर शोषित.

पण पैशाचे जग त्यांना बाहेर राहू द्यायला तयार नाही. त्‍यांचा समावेश आमच्‍या अर्थचक्रात व्‍हायलाच हवा असा ‘प्रगत’ जगाचा अट्टाहास आहे. त्‍याला ‘फायनान्शिअल इन्‍क्‍लुजन’ (वित्‍तीय समावेश) असे छान नाव आहे. पंतप्रधानांनी त्‍याला ‘जन-धन योजना’ असे यमकी नाव दिले आहे. आम्‍ही ज्‍या पैसा भाषेत बोलतो, त्‍याच भाषेत सर्वांनी बोलले पाहिजे असे प्रगत जगाने ठरवले आहे. वसाहतवादाच्‍या काळात ‘व्‍हाईट मॅन्‍स बर्डन’ (गोर्‍या माणसावरचे ओझे) असा एक सिध्‍दांत प्रचलित होता. या सिध्‍दांतानुसार सार्‍या जगाचा उद्धार करायचे ओझे गोर्‍या माणसावर आहे असे गोर्‍या माणसांनीच ठरवून घेतले होते. सर्वांनी युरोपिय पद्धतीचे कपडे घालणे, युरोपिय भाषा बोलणे, युरोपिय व्‍यसने करणे – अशा अनेक गोष्‍टींचा अंमल त्‍यातूनच जगावर लादला गेला. असेच आता जन-धनाचे आहे.

पैशाच्‍या जगात लोकांना ओढून ताणून आणण्‍यामागचा उद्देश चांगला असेल, पण पळत्‍या घोड्यावर बांधून घातलेल्‍या अननुभवी माणसाचे काय होईल? त्‍याला या जगात टिकता यावे, ‘स्‍वस्‍थ’ राहता यावे याची काळजी घेणार्‍या रचनाही पैशाच्‍या जगाने पुरवल्‍या पाहिजेत.

– मिलिंद थत्‍ते

(पूर्वप्रसिद्धीः- लोकमत मंथन)

मुंबईचे पाणी की कंत्राटदार विकास?

‘‘मुंबईची पाणी समस्‍या भविष्‍यात भीषण स्‍वरूप धारण करू शकते. दमणगंगा व पिंजाळ नद्यांचे पाणी अडवून मुंबईकडे वळविण्याच्या योजनेस केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना पुढील २५ वर्षे पाणीकपात सहन करावी लागणार नाही.’’ अशी गर्जना महाराष्‍ट्राच्‍या माननीय महसूल मंत्र्यांनी केल्‍याचे वाचले. (लोकसत्‍ता 21 नोव्‍हेंबर 2014) मुंबईचा पाणी प्रश्‍न नेमका काय आहे, हे मात्र या गर्जनेत ऐकू आले नाही.

1993 साली शासनाने मुंबईच्‍या भविष्‍यकालीन पाणी प्रश्‍नासाठी नेमलेल्‍या डॉ. माधवराव चितळे समितीने बृहन्‍मुंबईची लोकसंख्‍या 2011 साली 13.79 दशलक्ष असेल असा अंदाज करून किती धरणे लागतील याचा आडाखा बांधला होता. (चितळ्यांना पूर्वीपासून मोठ्या धरणांचा चष्‍मा आहे हे सर्वविदीत आहेच. त्‍यामुळे ते मोठी धरणे सुचवतील याच हेतूने त्‍यांची नेमणूक झाली असेही शक्‍य आहे.) प्रत्‍यक्षात 2011च्‍या जनगणनेनुसार बृहन्‍मुंबईची लोकसंख्‍या फक्‍त 12.43 दशलक्ष आहे. म्‍हणजेच पाण्‍याची गरज चितळे समितीने वर्तवल्‍यापेक्षा 326.4 दशलक्ष-लिटर-प्रतिदिवस कमी असणार आहे. अलिकडेच पूर्ण झालेल्‍या मध्‍य-वैतरणा धरणातूनच 455 दशलक्ष लिटर प्रतिदिवस पाणी मिळणार आहे. जर संभाव्‍य गरजेपेक्षाही जास्‍त पाणी मुंबईला या एकाच धरणातून मिळणार आहे, तर मग इतर 10 धरणे पूर्ण करण्‍याची गर्जना कशासाठी?

चितळे समितीचा आणखी एक झोल होता. दरडोई दररोज 240 लिटर पाणी लागेल अशा दराने त्‍यांनी पाण्‍याची गरज काढली होती. लंडन आणि पॅरिसमध्‍ये दरडोई दररोज 150 लि. तर सिंगापूरमध्‍ये दरडोई दररोज 160 लि. एवढेच पाणी पुरवले जाते. सेंट्रल पब्लिक हेल्‍थ अँड एन्‍हायर्नमेंटल एंजिनिअरिंग ऑर्गनायझेशनने निर्धारित केलेले 135 लि. दरडोई दररोज हे मानक भारत देशात सर्व नागरी भागासाठी प्रमाण धरले जाते. मग मुंबईतच 240 लि. दरडोई दररोज हे मानक या आंतरराष्‍ट्रीय जलतज्‍ज्ञांनी कसे काढले?

पिंजाळ धरणाचा वारंवार उल्‍लेख मंत्रीमहोदय आणि मुंबई महानगरपालिका करत आहेत. या धरणाच्‍या मॉट मॅक्‍डॉनल्‍ड कल्‍सल्‍टंट्स यांनी केलेल्‍या प्री-फीजिबिलिटी स्‍टडीमध्‍ये मुंबईची लोकसंख्‍या आहे त्‍यापेक्षा 2.07 दशलक्ष जास्‍त धरली आहे. म्‍हणजे पुन्‍हा तेच!

मुंबईच्‍या म‍हापालिका आयुक्‍तांनी केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाला लिहीलेल्‍या पत्रात मुंबईत सध्‍या 3520 दशलक्ष लिटर प्रतिदिवस इतके पाणी उपलब्‍ध असल्‍याचे म्‍हटले आहे. मुंबईत झोपडपट्टीत राहणार्‍या जनतेस 100 लि.दरडोई दर दिवस व इतरत्र राहणार्‍या जनतेस 200 लि.दरडोई दर दिवस असे पाणी सध्‍या मिळते – म्‍हणजे पिण्‍यासाठी व घरगुती वापरासाठी 1983 दशलक्ष लि. दर दिवस इतके पाणी लागते. 260 दशलक्ष लि. दर दिवस इतके पाणी व्‍यावसायिक आस्‍थापनांमध्‍ये वापरले जाते. हे सर्व आकडे मुंबई महापालिका उपायुक्‍त श्री. बांबळे यांच्‍या नोव्‍हें 2012च्‍या अहवालात आहेत. त्‍यांच्‍याच म्‍हणण्‍याप्रमाणे सध्‍या 180 लि. दरडोई दरदिवस इतके पाणी उपलब्‍ध आहे. (म्‍हणजे लंडन-सिंगापूरपेक्षा जास्‍त झालं की!)

घरगुती वापराचे आणि औद्योगिक वापराचे पाणी सोडता 1157 दशलक्ष लि. दर दिवस इतके पाणी मुंबईकडे आत्‍ताच अतिरिक्‍त आहे. म्‍हणजे एकूण पाण्‍याच्‍या 33%. त्‍यातले 25% वाया जाते (हेही लाजिरवाणे आहे). तरीही 8% शिल्‍लक राहतेच. वाया जाणारे पाणी 880 दशलक्ष लि. दर दिवस आहे. हे वाचवले तरी दोन नवीन धरणे बांधायची गरज उरणार नाही. मुंबईत काही भागात पाण्‍याची अडचण आहे, पण ती पाणीसाठा कमी असण्‍याची नाही. पुरवठ्यातल्‍या गलथानपणाची आहे. त्‍याची शिक्षा ठाणे-रायगडमधल्‍या आदिवासी गावांना का द्यायची?

ठाण्‍यात जिल्‍हाधिकारी कार्यालयातल्‍या एका कार्यक्रमासाठी काही आदिवासी ग्रामस्‍थांसोबत गेलो होतो. ठाण्‍यात एस्‍टी शिरल्‍यावर मोठमोठे तलाव दिसतात. ते बघून एका ग्रामस्‍थाने सहज प्रश्‍न केला, ‘‘इथे एवढे पाणी आहे, हे पाणी आजूबाजूच्‍या वस्‍त्‍यांना वापरत असतील ना?’’ इतका कॉमन सेन्‍स आपल्‍या सरकारकडे मात्र नाही. ठाण्‍यातले तलाव ‘ब्‍युटीफाय’ करून त्‍यात होड्या फिरवणे आणि भेळपुरी खाणे एवढाच उपयोग केला जातो. ठाणे महापालिकेच्‍या पर्यावरण सद्यस्थिती अहवालानुसार ठाण्‍यात 35 तलाव आहेत. सर्व तलाव मिळून 40 हेक्‍टर एवढे प्रचंड क्षेत्र आहे. त्‍यातले थेंबभरही पाणी न वापरता ठाणे महानगरपालिकेला शाई धरण बांधून हवे आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 33 हेक्‍टरवर पसरलेले 25 तलाव आहेत. कल्‍याण-डोंबिवलीत 29 तलाव आहेत. त्‍यातल्‍या 9 तलावांच्‍या सौंदर्यीकरणासाठी शहर विकास आराखड्यात 878 लाख रूपयांचा प्रस्‍ताव आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात येणार्‍या (बृहन्‍मुंबई, ठाणे, कल्‍याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, भि‍वंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर) सर्व भागात 2500 मिमीपेक्षा जास्‍त पाऊस पडतो. महाराष्‍ट्र प्रादेशिक व शहर नियोजन कायदा कलम 37(1) खालील नियोजन नियंत्रण नियमांमध्‍ये 2005 पासून पाऊसपाणी संकलनाचा अंतर्भाव करण्‍यात आला आहे. बृ.मुं.म.पा.ने 2007 पासून 300 चौ.मी. पेक्षा जास्‍त क्षेत्र असलेल्‍या इमारतींना पाऊसपाणी संकलन सक्‍तीचे केले आहे. आम्‍ही माहिती अधिकाराखाली विचारणा केली, तेव्‍हा महापालिकेच्‍या एकाही कार्यालयास किती पाऊसपाणी संकलित केले जाते, याची माहिती देता आली नाही. आपणहून पाऊसपाणी संकलन करून ते वापरणार्‍या सोसायट्या मुंबईत आहेत. खोतवाडी झोपडपट्टीत एका संस्‍थेने बांधलेले शौचालय रोज 1,000 हून अधिक लोक वापरतात. रोज 8000 लि. पाणी वापरले जाते. हे शौचालय पूर्णपणे पावसाच्‍या साठवलेल्‍या पाण्‍यावर चालते. चेन्‍नईच्‍या महापालिका आयुक्‍तांनी पाऊसपाणी संकलन प्रचंड प्रमाणात यशस्‍वी करून दाखवले. हे मुंबई का करू शकत नाही?

12व्‍या नियोजन आयोगाच्‍या नागरी पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कार्य गटाने स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, महानगरांनी स्‍थानिक जलस्रोत अग्रक्रमाने वापरावेत तसेच पाऊसपाणी वापरावे व शेवटचा उपाय म्‍हणूनच नवीन प्रकल्‍प करावेत. पहिले दोन्‍ही उपाय अजिबात न करता मोठमोठी धरणे बांधायची, त्‍यासाठी गावे बुडवायची, अत्‍यंत गरीब लोक देशोधडीला लावायचे, हे निव्वळ कंत्राटदारांच्‍या विकासाचे धोरण आहे. ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ असे म्‍हणून सत्‍तेवर आलेल्‍या सरकारने कंत्राटदारधार्जिणे धोरण चालवायचे म्‍हणजे रयत मारून वतनदार माजवण्‍याचे काम आहे.

– मिलिंद थत्‍ते

(संघटक, वयम् चळवळ)

milindthatte@gmail.com

ता.क. आम्‍ही लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्‍हा प्रत्येकाकडे बॅट नसे. ज्‍याच्‍याकडे बॅट असे, तो तीनदा आऊट झाल्‍यावर एकदा आऊट असा नियम मान्‍य करावा लागायचा. भाजपाच्‍या धरणशाहीत मुंबईने कोट्यवधी लिटर पाणी वाया घालवले तरी ते आऊट नाही, आणि आदिवासी गावांनी मात्र न खेळताच आऊट व्‍हायचे असा खेळ चालणार नाही. शासनाने सर्व नागरिकांना समान लेखावे. अन्‍यथा आमच्‍याकडेही बॅट आहे हे आम्‍हाला दाखवून द्यावे लागेल.

कर्ण

2001 साली मी असमच्‍या तिनसुकिया आणि सिलचर जिल्‍ह्यांमध्‍ये होतो. ते सारे चाय बागान क्षेत्र आहे. शेकडो एकरांवर पसरलेले चहाचे मळे. एकेका कंपनीच्‍या मालकीच्‍या ‘टी इस्‍टेट’ अर्थात स्‍थानिक भाषेत ‘चाय बागान’. मुदी पाडल्‍यासाखे छोटे छोटे डोंगर, त्‍यावर हे चहाचे एकसुरी मळे, त्‍यातून विंचरलेल्‍या वाटा, आणि पायथ्‍याशी एका रांगेत पत्र्याची चौकोनी घरे असलेल्‍या लेबर लाईन्‍स – म्‍हणजे मजूर वस्‍त्‍या. या मजुरांना शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी इथे आणले. ट्रेनच्‍या ट्रेन भरून आणले. इथेच त्‍यांना वसवले. हे सारे मूळचे संथाल परगणा आणि छोटानागपुर इलाक्‍यातले (म्‍हणजे आताच्‍या झारखंडमधले) होते. संथाल आणि मुंडा जमातींनी ब्रिटीश साम्राज्‍य आणि अन्‍याय्य वन कायद्यावि‍रूध्‍द उठाव केला. त्‍यांचा उठाव चिरडून काढल्‍यानंतर तिथल्‍या तरुण स्‍त्रीपुरूषांना ब्रिटीशांनी मोठ्या चातुर्याने दूर नेऊन ठेवले. त्‍यांना रोजगार देण्‍याच्‍या मिषाने इथे आसामच्‍या चाय बागानमध्‍ये आणून ठेवले. आता या सर्वांना ‘टी ट्राईब्‍स’ किंवा चाय जनजाती म्‍हणून ओळखतात. तिथल्‍या एक बागानमध्‍ये मला एक प्राध्‍यापक भेटले. त्‍यांच्‍या घरात ‘बिरसा’चे चित्र लावलेले होते. त्‍यांनी त्‍यांच्‍या कुटुंबाची कहाणी सांगताना मुंडा जमातीच्‍या इतिहासाची सैर करवून आणली. बिरसा हा जेमतेम 30 वर्षांचे आयुष्य लाभलेला तरूण हा केवळ मुंडाच नव्‍हे, तर सर्वच आदिवासी क्रांतिकारकांचा मुकुटमणी शोभावा असा होता. 1900 साली ब्रिटीश तुरूंगात विषप्रयोगाने बिरसाला हौतात्‍म्‍य आले. मुंडा जमातीने अनेक वेळा ब्रिटीश साम्राज्‍याविरूध्‍द उठाव केले. जमीनदार आणि ख्रिस्‍ती मिशनर्‍यांची इंग्रज साम्राज्‍याशी हातमिळवणी असल्‍यामुळे त्‍यांच्‍याही विरोधात मुंडा आणि संथालांनी रणशिंग फुंकले होते. 1855 साली सिध्‍दो-कान्‍हू या भावांच्‍या नेतृत्‍वाखाली संथालांनी उठाव केला. मुंडा सरदारांनी 1832 आणि पुन्‍हा 1867 साली उठाव केले होते. देशातल्‍या इतरही अनेक जमातींनी इंग्रज राज्‍याविरूध्‍द उठाव केले होते. त्‍यांना आपल्‍या इतिहासाच्‍या पुस्‍तकात स्‍थान नाही, म्‍हणून आपल्‍याला ते कळत नाही. 1857चे स्‍वातंत्र्ययुध्‍द होण्‍याआधीच आदिवासी वीरांनी हत्‍यारे उपसली होती. मुंडा जमातीचा शेवटचा उठाव म्‍हणजेच ‘उलगुलान’ 1895 सालचा. चायबासा गावातल्‍या मिशनच्‍या शाळेत चार इयत्‍ता शिकलेल्‍या बिरसाला जमीनदार-इंग्रज-मिशनरी ही अभद्र युती आपल्‍या समाजाला कशी नागवत चालली आहे, हे समजू लागले तेव्‍हा तो केवळ वीस वर्षाचा होता. आपल्‍या पाव्‍याच्‍या वादनाने गावाला मोहित करणार्‍या या तरुणाने लोकजागर सुरू केला. गावागावात लोक ‘बिरसाईत’ होऊ लागले. आपल्‍याला परमेश्‍वरी आदेश आहे आणि मुंडा स्‍वतंत्र होणारच अशी बिरसाची श्रध्‍दा होती. सिध्‍दो-कान्‍हू या ‘संथाल हूल’च्‍या (विद्रोहाच्‍या) नेत्यांचीही अशीच श्रध्‍दा होती. हे ऐकताना मला न राहवून शिवाजीमहाराजांना भवानी मातेने तलवार दिल्‍याची गोष्‍ट आठवली. आपल्‍या नेत्‍याला साक्षात् ईश्‍वरानेच पाठबळ दिले आहे, या कल्‍पनेने बहुधा सैन्‍याचे मनोबल प्रचंड वाढत असावे. बिरसावर वैष्‍णव पंथाचा प्रभाव होता. त्‍याने स्‍वच्‍छतेचा आग्रह धरला. हळदीत बुडवून पिवळे केलेले पागोटे आणि तसेच स्‍वच्‍छ धोतर ही त्‍याच्‍या पंथाची खूण झाली. दोन ठिकाणी झालेल्‍या मोठ्या लढायांमध्‍ये दहा ते पंधरा हजाराहून जास्‍त मुंडा स्‍त्रीपुरूष तीरकामठे, कुर्‍हाडी, गलोली घेऊन इंग्रज पोलिसांविरूध्‍द लढायला उतरले. सुरूवातीला माघार घेतल्‍यानंतर इंग्रजांनी आणखी सैन्‍यबळ आणि तोफा आणल्‍या. तोफांकडे धावत जात हजारो आदिवासी तरूण शहीद झाले. असमान लढाई असूनही मुंडांनी शरणागती पत्‍करली नाही. अखेर बिरसाला अटक झाल्‍यावर उठाव शमला. पुढच्‍या काही वर्षात ब्रिटीशांनी मुंडा तरूणांना आगगाडीच्‍या वॅगनमध्‍ये भरून असमच्‍या चाय बागानमध्‍ये नेऊन टाकले.

महाश्‍वेतादेवींनी ‘अरण्‍येर अधिकार’ या कादंबरीत बिरसाचे रोमांचक चरित्र रेखाटले आहे. वास्‍तविक बिरसा समस्‍त देशाचा हिरो असायला हवा. पण डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्‍मा फुले यांना जसे आपण एकेका जातीचे हिरो बनवून ठेवले आहे, तसाच बिरसाही दुर्दैवाने मुंडा जमातीचा आणि फार तर आदिवासींचा हिरो झाला आहे.

असमच्‍या प्रवासातला एक सोबती होता कॉर्नो. एकदम गप्पिष्‍ट आणि प्रेमळ. एका प्रशिक्षण वर्गात आम्‍ही तीन दिवस एकत्रच होतो. तिथे नवीन आलेल्‍या कार्यकर्त्‍यांशी त्‍याचे वागणे फार लोभस होते. सवयीने मी त्‍याला त्‍याची पार्श्‍वभूमी विचारली – कोण, कुठला, शिक्षण कुठे, या संस्‍थेत कधीपासून वगैरे. थोडं अडखळत त्‍याने सांगायला सुरूवात केली.

कॉर्नो एका टी इस्‍टेटमधल्‍या लेबर लाइनीतल्‍या मजूर जोडप्‍याचा मुलगा. भावंडामध्‍ये तो सर्वात हुशार. नववीत तो शाळेत पहिला आला. लेबर लाइनीत त्‍याचे खूप कौतुक झाले. त्‍याला भेटायला काही दादालोक येऊन गेले. पाठीवर बंदुका लटकावलेले हे लोक त्‍याच्‍याशी अतिशय प्रेमाने बोलले. त्‍याला बक्षीस म्‍हणून त्‍यांनी काही पुस्‍तके दिली. अधूनमधून ते त्‍याला भेटायला यायचे. कॉर्नोच्‍या आईला हे आवडत नव्‍हते. पण कॉर्नोला मात्र ते लोक आवडत. आपल्‍या लोकांना अन्‍यायातून सोडवले पाहिजे, मुक्‍ती मिळवली पाहिजे, असे काही काही ते लोक बोलत. असमच्‍या स्‍वातंत्र्यासाठी आपण लढा देतो आहोत. या लढाईतला तूही एक महत्त्‍वाचा सैनिक आहेस, असे त्‍यांनी कॉर्नोला पटवले. मिसरूड फुटण्‍याच्‍या वयात त्‍याला ते खूपच साहसी वाटले. त्‍यांनी त्‍याला एक सायकल घेऊन दिली. त्‍याची घंटी जोरात वाजवत तो फिरायचा. त्‍यांच्‍या चिठ्ठ्या पोचवण्‍याचे काम तो करू लागला. कॉलेजात असताना त्‍यांनी त्‍याला बढती दिली. तो छुप्‍या टोळ्यांचा गाईड झाला. सैन्‍याची, पोलिसांची नजर चुकवून बंदूकधारी टोळ्यांना तो त्‍याच्‍या क्षेत्रातून सुरक्षित घेऊन जात असे. कॉलेजच्‍या दुसर्‍या वर्षाला असताना त्‍यांनी त्‍याला कोअर मध्‍ये घेतले. शस्‍त्रास्‍त्रे आणि गनिमी युध्‍दाच्‍या प्रशिक्षणासाठी त्‍याला बांग्‍लादेशात पाठवण्‍यात आले. तिथून परतत असतानाच भारतीय सीमा सुरक्षा दलाशी झालेल्‍या चकमकीत त्‍याचे दोन मित्र ठार झाले. दोनच वर्षात कॉर्नो उल्‍फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम) या संघटनेचा नामचीन अतिरेकी झाला. अनेक सैनिक आणि नागरी अधिकारी त्‍याने मारले. सैन्‍याच्‍या हिटलिस्‍टवर त्‍याचे नाव वरच्‍या पाच-दहा जणांत होते. तीनदा त्‍याला सैन्‍याने पकडले. बडव बडव बडवले, पण त्‍याच्‍या तोंडून कसलीच माहिती त्‍यांना वदवता आली नाही. त्‍याला अर्धमेला करून सोडून दिले. एकदा त्‍याला उलटा टांगून डोके अनेक वेळा पाण्‍यात बुडवून पाय आणि पोटर्‍या फोडून काढल्‍या तरी याने मेजरला कसलीच माहिती सांगि‍तली नाही. मग त्‍याला छावणीच्‍या बाहेर नेऊन उभा केला. हात सोडले. त्‍याच्‍या मागे थोड्या अंतरावर मेजर उभा होता. ‘एक दोन तीन’ म्‍हणायच्‍या आत पळून जा, नाहीतर डोक्‍यात गोळी घालेन – असे मेजरने त्‍याला सांगितले. दोन आकडे झाले तरी कॉर्नो जागचा हलला नाही. बाजूला पहार्‍यावर असलेला हवलदार त्‍याच्‍या जवळ आला. ‘‘क्‍यों बेटे, मरना चाहते हो? मां बाप को यही दिन दिखाना था? मेरा बेटा तुम्‍हारी उमर का है. मेरी बात मान लो, तुम्‍हारे लीडर तुम्‍हारे नही है, मां बाप ही तुम्‍हारे है’’. कॉर्नोच्‍या मागे मृत्‍यू दार वाजवत उभा होता. यापूर्वी अनेक जवळच्‍या सहकार्‍यांचे मित्रांचे मृत्‍यू त्‍याने पाहिले होते. सणकन् गोळी येते आणि मग… काहीच उरत नाही. आपले पुढारी छुप्‍या नावांनी वावरतात, आपले नाव मात्र उघडे असते. प्रत्‍यक्ष लढायला आपण पुढे असतो, सरकारशी तडजोडी करताना, पैसे वाटताना मात्र आपल्‍याला किंमत नसते. ज्‍या गुलामीची गोष्‍ट आपले पुढारी करताहेत, ती अशी बलिदाने करून जाणार आहे का? की आपला बकरा करून दुसरेच कोणी तुंबड्या भरणार आहेत? हे प्रश्‍न बराच काळ कॉर्नोला छळत होते. मनातल्‍या खोल गर्तेतून उसळी मारून ते प्रश्‍न वर आले. मागे पिस्‍तूल आणि पुढे हे प्रश्‍न.

कॉर्नो त्‍यांना म्‍हणाला, ‘मी पळालो तर तुम्‍ही माझे एन्‍काउंटर करणार हे मला माहीत आहे. मला माझ्या भावाशी बोलायला वेळ द्या.’ कॉर्नोचा भाऊ एका राष्‍ट्रीय संस्थेचा कार्यकर्ता होता. कॉर्नोने हा अतिरेकी मार्ग सोडावा म्‍हणून त्‍याने अनेक वेळा सांगून पाहिले होते. पण कॉर्नोला त्‍यात हिरोगिरी वाटत होती आणि नंतर तो त्यातच पुरता अडकला होता. कॉर्नोच्‍या भावाने आपल्‍या संस्‍थेच्‍या वरिष्‍ठांना सांगितले. त्‍यांनी असम सरकारमधल्‍या काही अधिकार्‍यांशी संपर्क केला, सैन्‍याच्‍याही अधिकार्‍यांशी बोलणे केले. कॉर्नो एका पोलिस ठाण्‍यात शरण आला. तो जिथे शरण आला, तिथे त्‍याचे नाव ऐकूनच फौजदाराची भंबेरी उडाली होती. सहा महिन्‍यांच्‍या तुरुंगवासानंतर त्‍याला पॅरोलवर सोडण्‍यात आले. त्‍यानंतर दीड वर्षाने माझी त्‍याची भेट झाली होती.

कॉर्नोने कागदावर नाव लिहीले ते ‘कर्ण’ होते. त्‍याचा असमिया उच्‍चार कॉर्नो होता. त्‍याचे नाव कर्ण असणे हा एक विचित्र काव्‍यगत न्‍याय होता. माझ्यासाठी कॉर्नोची भेट हे मोठेच धक्‍का-शिक्षण होते. नंतरच्‍या काळात, अशीच हुशार मुले अतिरेकी संघटना आपल्‍या ताब्‍यात घेतात हे लक्षात आले. अगदी आत्‍ता गडचिरोलीच्‍या एका पत्रकार मित्राने सांगितलेली घटना आठवली. तिथल्‍या गावांमध्‍ये आठवीच्‍या पुढची मुले राहतच नाहीत. आपल्‍या मुलांना नक्षलवादी अतिरेकी त्‍यांच्‍या जाळ्यात ओढतील या भीतीने पालक मुलांना दूरच्‍या शहरांमध्‍ये पाठवून देतात.

–  मिलिंद थत्‍ते

(कॉर्नोच्‍या नावानिशी त्‍याची गोष्‍ट किमान 10 वर्षे कोणाला सांगणार नाही, असा मी त्‍याला शब्‍द दिला होता. त्‍याच्‍या सुरक्षेसाठी ते गरजेचे होते. आता 12 वर्षे झाली. बहुधा आता तो सुरक्षित आणि शांत आयुष्‍य जगत असेल.)

रानबखर

cover ranbakhar
cover ranbakhar

रानबखर हे माझे पुस्‍तक समकालीन प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले. नवीन पुस्‍तक हातात आले की, पुस्‍तकाच्‍या आतले पहिले पान आणि शेवटच्‍या पानावरचा ब्‍लर्ब हे आपण हमखास वाचतो आणि मग पुस्‍तक घ्‍यायचे की नाही, वाचायचे की नाही ते ठरवतो. माझ्या खास वाचकांसाठी हे दोन्‍ही इथे देतो आहे.

पुस्‍तकाचे आतले पहिले पानः

ही बखर आहे, इतिहास नाही. 

पक्षधराने लिहीलेले घडल्‍या गोष्‍टीचेच हे कवन आहे.

स्‍वतः रानात असताना आणि रानसख्‍यांवर लिहिली,

म्‍हणून ही… रानबखर.

पुस्‍तकाचे मागचे पानः 

आदिवासी म्‍हणजे ‘रानातले राजे’ अशीच आजवरची रूढ प्रतिमा. पण गेल्‍या पंचवीस-तीस वर्षांत आदिवासींच्‍या जगण्‍याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्‍यात कुपोषणापासून विस्‍थापनापर्यंत आणि स्‍वशासनापासून ते नक्षलवादापर्यंत अनेक बाबी आहेत.

मग, आदिवासींचं हे आजचं जगणं कसं आहे? त्‍यांचे खरे प्रश्‍न काय आहेत? त्‍यांच्‍या कष्‍टमय जगण्‍याचा फास सुटावा, यासाठी काय प्रयत्‍न चालले आहेत? मायबाप सरकारच्‍या धोरणांमुळे त्‍यांच्‍या जगण्‍यावर काय परिणाम होतो आहे?

गेली दहा-बारा वर्षं नाशिक-ठाणे-नंदुरबार या पट्टयातील आदिवासींसोबत त्‍यांच्‍यातलाच एक बनून राहिलेल्‍या आणि त्‍यांच्‍याच नजरेतून त्यांची सुख-दुःखं बघण्‍याचा प्रयत्‍न करणा-या एका कार्यकर्त्‍याने सांगितलेली ही रानबखर.

गरजेपुरता सामाजिक

वेर्रिएर एल्विन हा विलायतेतून १९२७ साली हिंदुस्तानात आला. मध्य प्रदेशातल्या गोंड गावात १२ वर्षे राहिला. भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने भारतीय नागरिकत्व घेतले. आणि नेहरूंच्या काळात ईशान्य भारतातील आदिवासी विषयक सल्लागार म्हणून त्याने काम केले. त्याने व्यापक लिखाणही केले. १९४४ साली त्याने लिहिलेले अबोरिजिनल्स नावाचे पुस्तक आहे. त्यात त्याने कळवळून म्हंटले आहे, “देशातले अदमासे ८० टक्के आदिवासी हे आता बाहेरच्या जगाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या समस्या या इतर ग्रामीण भागाप्रमाणेच आहेत. त्यांच्या बाबतीत वेगळे धोरण असण्याची गरज नाही. पण २० टक्के मात्र अद्याप दुर्गम आहेत. ते त्यांच्या जुन्या जीवन शैली प्रमाणे आनंदात जगत आहेत. त्यांच्यावर  सरसकट ‘आधुनिक शिक्षण’ ‘विकास’ वगैरे लादू नये. म्हणजे त्यांनी तसेच राहावे असे नाही, त्यांना आरोग्य सेवा मिळायला हवी, योग्य शिक्षण मिळायला हवे. पण त्यांची वृत्ती, आनंद, संस्कृती टिकले पाहिजे…”  
म्हणजे विकास तर हवा, पण गाळीव हवा. –  एल्विनची ही वैचारिक कसरत खरं तर शंभर वर्षे जुनी आहे. पण माझ्या पिढीत आदिवासी गावात राहणाऱ्या कार्यकर्त्यालासुद्धा ही कसरत समजू शकते. आधुनिकीकरण आपल्याला हवे तसे गाळून घेता येत नाही. एकदा ते येऊ लागले की त्यातले बरे वाईट सगळेच येते. ते बरेचदा अपरिहार्य असते. हे सारे आमच्या तार्किक मनाला समजते, पण समोर काही तरी सुंदर दिसते आहे आणि ते नष्ट होणार याचे दु:ख व्हायचे तेही होतेच. एल्विन लोकांच्यात राहत होता. त्यांच्या जगण्याचा अर्क त्याला उमजला होता. त्यामुळेच तो या द्वैतात सापडला असावा. 
एल्विनने मध्य भारतात १९४० साली घेतलेले अनुभव आणि आमचे आत्ताचे मुंबईपासून जेमतेम १५० किमीवर असलेल्या गावातले अनुभव यांची तुलना होऊ शकणार नाही हे तर खरेच. पण आधुनिकीकरण येत असताना आदिवासी समाजाचे जे काही जाईल असे तो म्हणत होता, ते जाताना मात्र आम्हाला आज दिसते आहे. काळाच्या घड्याळातले हे वाळूचे कण आहेत. ते जाणारच आहेत. पण ते हातातून जात असताना टिपून तरी ठेवावेत असे आम्हाला वाटते. माणूस नावाच्या सामाजिक प्राण्याचा जेंव्हा इतिहास लिहायचा असेल, तेंव्हा आपण “का बरे सामाजिक होतो” याचे उत्तर शोधावे लागेल. तेंव्हा हेच वाळूचे कण उपयोगी पडतील. कारण आजही ज्यांना समाज म्हणून काही जीवन आहे, असे थोडेच लोक शिल्लक आहेत. त्यांच्यात आत्ता होणारे बदल नीट पाहिले तर हे समजू शकेल. 
 … … … … … … 
सह्याद्रीतल्या आदिवासी समाजात (म्हणजे वारली, कोकणा, ठाकूर इ.) दर तीन ते पाच वर्षांनी रवाळी असते. गावातले सर्व पुरुष आठ रात्री गावाबाहेर जंगलात जाउन राह्तात. काही व्रते पाळतात. मांसाहार करत नाहीत, शिकार करत नाहीत. दारू पित नाहीत. दिवसभर उपास करतात. रात्री गावदेव आणि कणसरी मातेसमोर घुमतात. तार्प्याच्या सुरांवर रात्र रात्र नाचतात. जंगलातल्या दुष्ट शक्तींपासून गावाचे रक्षण व्हावे, शेतातल्या पिकावर कणसरीची कृपा असावी, जनावरांचे वाघदेवाने रक्षण करावे, आपण जंगलाला दुखावले असेल तर त्याची माफी मिळावी असा हेतू या रवाळीच्या व्रतामागे असतो. मागच्याच आठवड्यात आम्ही राहतो त्या पाटीलपाडा गावातली रवाळी झाली. गावातला रहिवासी म्हणून मीही त्यात होतो. रात्री जंगलातच उघड्या माळावरच मुक्काम असतो. रात्री घुमणे झाले कि मग जेवण होते आणि अनेक शेकोट्यांभोवती लोक पथारी पसरतात. म्हातारी माणसं बिड्या लावतात अणि जुन्या गोष्टी सांगतात. नवसुबाबानी एक जुनी गोष्ट सांगितली. त्याचा बाबा बाळू बरफ तेंव्हा गावचा पाटील होता. (म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ). लोकांनी माउलीच्या दात्याला (म्हणजे कड्याखाली) खडान लावली. तिथल्या वहळात अमाप पाणी होतं. कधी नव्हे इतकी भरमसाट मच्छी गावली. प्रत्येक कुटुंबात दोन दोन किलो तरी मच्छी आली असेल. पण बाळू बाबा अणि गावातले इतर जाणते डवरे काळजीत पडले. (डवर  म्हणजे वृद्ध, झाड डवरले म्हणजे समृध्द झाले, तसे माणूस म्हातारा झाला कि त्यालाही वारली ‘डवर’ म्हणतात.) 
हे डवरे काळजीत पडले, कारण आपल्याला गरज नाही एवढी मच्छी आपण पकडून आणली. आता जंगलातली माउली कोपेल. संध्याकाळ झाली तसे एक आक्रीत घडले. कधी नव्हे तो गावाच्या वेशीवर येउन तरस ओरडू लागले. त्यांच्या भेसूर आवाजाबरोबर जंगलातून स्त्रीच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. गावातल्या सर्व तीस घरातले लोक पाटलाच्या घराशी भिऊन गोळा झाले. तरस गावात शिरू नयेत म्हणून बाजूबाजूने जाळ पेटवला. पाटील, भगत, आणि डवरे  एकत्र बसले. माउलीची इच्छा समजून घेतलॆ. सर्व घरांमधून जास्तीची मच्छी गोळा केली. टेंभे घेतलेले तरुण आणि पाटील व भगत ती सर्व मच्छी घेऊन ताबडतोब निघाले आणि त्याच वहळात पुन्हा सोडून आले. वेशीवरच्या मखराशी त्यांनी वाघदेवाची क्षमा मागितली, त्याला त्याचा हिस्सा दिला. मग एक तासाने ते तरस निघून गेले आणि रडण्याचे आवाजही थांबले. 
ही गोष्ट तिथे जंगलातल्या माळावर पडून मी ऐकत होतो. तेंव्हा तिथे दूर अंतरावर विजेचे दिवे होते, चार लोकांचे मोबाईल होते. जेंव्हा यातले काहीच नव्हते. हे किर्र अंधारे जंगल होते. आणि माणसं  त्या अंधाराशी झुंजून आणि जुळवून राहत होती, तेंव्हाची गोष्ट मला नवसूबाबा सांगत होता. जीव राखणं ही तर प्रत्येक जीवाची प्राथमिक प्रेरणा असते. जेंव्हा जीवाची भीती असते तेंव्हा माणसं कशी घट्ट  एकत्र येतात हेच मी नवसुबाबाच्या गोष्टीतून ऐकत होतो. 
आदिवासी गावात सामुहिक जगणे अजून तरी टिकून आहे. संकटात आणि सुखातही गाव एकत्र असते. पण यातले युगांतर आमच्या डोळ्यासमोर घडताना दिसते आहे. मे महिन्यातली लग्ने आठवतात… 
गावात कुणाच्या घरी लग्न असले, की गावातल्या सर्व घरच्या मुली त्या घरी पाणी भरायला जातात. कोणी कुणाला हे सांगावे लागत नाही.  आत्ताच एका प्रतिष्ठित घरातले लग्न झाले. त्यांनी सरळ मोटर लावून पाणी भरले. आपल्याला नको कोणी मदतीला यायला! लग्नघरी रोज रात्री गावातल्या सर्व स्त्रिया गाणी म्हणायला जमतात. त्या गाण्यांमधून “जनरल संसार कसा करावा” पासून “पलिकडच्यांची चेष्टा” असे विषय असतात. अशी गाणी म्हणायला स्त्रिया आपणहून येतात. लग्नात सर्व जण सहभागी होण्याची ती एक खूण असते. गावातले एक दुकानदार आहेत, त्या दुकानदारीण बाईंचा तोरा गावातल्या काही बायांना रुचत नाही. त्यामुळे त्यांच्याकडच्या लग्नात कोणी गायला जाईना. त्यांनी पैसे देऊन बायांना बोलावले. मग काही बाया आल्या. नंतर दुसरे एक लग्न आले, ते साधारण घरातले होते. पण तिथेही बायांना पैसे हवे होते. आमच्या गावातल्या ‘सहकारी’ उपक्रमाचे अशा रीतीने ‘व्यवसायीकरण’ (खरे तर monetisation)  झाले. ग्राम सभेने ठराव केला, लग्नातले मान-पान बंद! जर कोणी मान-पान केलेच तर ५००० रु दंड! गावातल्या एका बड्या धेण्डाने हा ठराव धाब्यावर बसवला. तो म्हणाला, मी ५००० दंड भरीन, मला ही रक्कम किरकोळ आहे. पण मी मान पान करणारच. माणसाच्या सामाजिकपणाची एक गरज यंत्राने संपवली अणि दुसरी गरज पैशाने संपवली. 
लग्नात बेन्जो पार्टी बोलावणे अणि त्यावर नाचणे हे तर अगदी कॉमन आहे. त्यात नाचताना लोक पारंपरिक पद्धतीने नाचत नाहीत. मुंबईत गणपतीत कसे, एकटेच एक हात वर करून आपल्याच तंद्रीत नाचतात, तसे हे नाचतात. असे नाचताना लोक एका झुंडीत असतात, पण एकत्र नसतात. एकाच्या नाचण्याचा दुसर्याशी संबंध नसतो. सगळे एकेकटे असतात. धुंद असते, पण एकट्याची.  
माळावर निशब्द रात्री ऐकलेल्या रवाळितल्या नाचाची आठवण येते. तिथले “देव अंगात येणे” हा मानसिक अनुभव सुद्धा सामुहिक असतो, आणि इथे फिल्मी गाण्यांवर आनंद घेतानाही प्रत्येक जण हळू हळू एकटा  होत असतो.
बा एल्विना, माणसाला जगण्यासाठी समाजाची गरज असते, तोपर्यंतच तो सामाजिक प्राणी असतो.… ८० वर्षांपूर्वी तुला हे कळलेही असेल, पण वळले नव्हते. काळाचा गीअर पडायला, युगांत व्हायला एवढा वेळ लागतोच. 
– मिलिंद थत्ते 

I, too, have a dream (Part 3) – A big step to make it a reality

Excellent post delineating Vayam’s victory in democratic empowerment of tribal people.

Atul Patankar

On 27 August 2013 , the Information Commission conducted the final hearing of our appeal. Being an experienced administrator, the Commissioner saw through the arguments of the Deputy Collector’s staff immediately. Mr. Shailesh Gandhi’s presence also helped us retain our confidence in these completely novel circumstances.

Finally, Mr. Gaikwad, Information Commissioner, pronounced his ruling. He asked the administration to compensate each applicant who came to Mumbai Rs. 2,000 each. Also, he issued show cause notice to the information officer for levying fine under 2 different sections of RTI Act – in each of the 1,272 cases. He ordered that all the information sought must be given to every applicant before 31 st October – and promised further stern action if this was not done.

But the most useful part of the order is that – he ordered all the district administrators to publish information about claims under the FRA …

View original post 496 more words

माणूस वि. निसर्ग (की माणूस?)

(अनुभव मासिकात जून 13 च्‍या अंकात प्रसिध्‍द झालेला लेख) 

एखादा बिबट्या मनुष्‍य वस्‍तीत शिरल्‍याची बातमी येते, मोठ्या शहरात शिरला तर मोठी बातमी येते आणि लहान गावात शिरला आणि माणसांनी त्‍याला मारला तर अजूनच मोठी बातमी येते. यालाच माणूस वि. निसर्ग संघर्ष असेही म्‍हटले जाते. किंवा झाडे तोडू नका, एक तरी झाड लावा, किंवा पक्ष्‍यांना पाणी पाजा नाहीतर निसर्गाचे काही खरे नाही असेही म्‍हटले जाते. एकूणच आजकाल माणूस निसर्गाच्‍या भलताच मागे लागला आहे आणि निसर्गाला वाचवण्‍याची गरज आहे असे चित्र उभे राहते. 

माणूस निसर्गाच्‍या विरोधात जातोय किंवा निसर्ग आणि माणसाचा संघर्ष होतोय ही विधानं मला थोडीशी दर्पोक्‍तीची वाटतात. माणसाची कुवत इतकी कमी आहे की तो काय डोंबलाचा निसर्गाच्‍या विरोधात जाणार? नवेनवे विषाणू येऊन माणसाला मारत आहेत, अशा सर्व विषाणूंवरही मात करणे माणसाला जमत नाही. तंत्रज्ञान इतके पुढे जाऊनही भूकंप थांबवणे किंवा त्‍सुनामी थांबवणे माणसाला जमलेले नाही. फार तर अशा नैसर्गिक आपत्‍तींची पूर्वसूचना देता येते. पण हे तर पूर्वीही जमत होते. भारतावर कोसळलेल्‍या त्‍सुनामीच्‍या वेळी किनारपट्टीवरची असंख्‍य माणसे गेली, तेव्‍हा अंदमानातील ‘अतिमागास’ जारवा जमातीचे लोक मात्र निसर्गातल्‍या खाणाखुणा ओळखून सुरक्षित जागी निघून गेले होते. निसर्गाशी संघर्ष करायला माणूस अणुरणिया थोकडा आहे, हे स्‍पष्‍टच आहे.

अर्थात् निसर्ग हा कोणी सर्वशक्तिमान देव आहे किंवा काहीतरी गूढ गहन परमात्‍मरूप शक्‍ती आहे असे माझे म्‍हणणे नाही. निसर्ग ही एक व्‍यवस्‍था आहे. ज्‍यात प्रत्‍येक जीवाला विशिष्‍ट स्‍थान आहे. मर्यादा आहेत. मृत्‍यू आहे. बलस्‍थाने आहेत. जीवनाचे साधन आहे. एकाच्‍या मरण्‍यावर दुसर्‍याचे जगणे अवलंबून आहे. मेलेल्‍या प्रत्‍येक जीवाचे विसर्जन आणि अजाताचे सृजन या दोन्‍हीच्‍या व्‍यवस्‍था निसर्गात आहेत. या सगळ्यात माणूस हाही एक घटक आहे. नाटकातले एक पात्र आहे. पण हे पात्र थोडेसे आगाऊ असल्‍यामुळे – आपण नाटकाच्‍या बाहेर आहोत, कधी प्रेक्षक तर कधी निर्माते आहोत असा त्‍याचा समज झाला आहे.

आदिम काळात माणसाला निसर्गाची भीती वाटत असे. आपल्‍यापेक्षा मोठी अशी कोणीतरी शक्‍ती हे सगळे चालवत आहे, अशी त्‍याची श्रध्‍दा ही अनाकलन, भय, आणि अवलंबन या तिन्‍हीतून निर्माण झाली असेल. वादळ का होते, तुफान पाऊस का पडतो, आजार का होतात, वणवे का लागतात या गोष्‍टींची कारणे माणूस शोधत होता. जसजशी कारणे कळत गेली, तसे अनाकलन कमी झाले पण अवलंबन शिल्‍लक राहिले. त्‍यामुळे श्रध्‍दा राहिली. निसर्गास दुखवले तर त्‍याचा कोप होईल, ही भक्‍तभावना राहिली. वननिवासी समाजांनी ‘निसर्ग’ नावाच्‍या एका सर्वव्‍यापी अमूर्त विराटाची कल्‍पना केली नाही. पण त्‍यांनी त्‍याच्‍या घटकांची पूजा मांडली. वारा पाऊस आणतो म्‍हणून त्‍याची पूजा. अग्‍नी अन्‍न शिजवतो म्‍हणून त्‍याची पूजा. नदी पाणी पुरवते म्‍हणून ती लोकमाता. धरतीतून अन्‍न उगवून येते म्‍हणून ती आई. काही झाडे औषधे देतात, काही जिवाणूयुक्‍त माती देतात, काही पाणी दाखवतात, तर काही झाडे आणखी काही कामास येतात – म्‍हणून त्‍यांना देवत्‍व. हे खरे तर देवाणघेवाणीचे नाते आहे. संस्‍कृती वगैरे म्‍हणायचे तर यात एक किमान सुसंस्‍कृतपणा हा आहे की आपल्‍याला जे उपयोगी पडतात त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञतेची भावना असावी.

तंत्रज्ञान विकसत गेले तसे निसर्गावर अवलंबून असण्‍याची जाणीव कमी होत गेली. अवलंबन कमी होणे कधीच शक्‍य नाही, पण त्‍याची जाणीव गुल् झाली. टॉम हँक्‍सच्‍या कास्‍ट-अवे चित्रपटातला नायक त्‍याचे विमान समुद्रात कोसळल्‍यावर वाचतो आणि एक निर्जन बेटावर येऊन पोचतो. तिथे अन्‍न गोळा करण्‍यासाठी त्‍याला खूप कष्‍ट करावे लागतात. आणि हात सोलून निघेपर्यंत लाकडे घासून त्‍याला एकदाची आग पेटवता येते. ती आग पेटल्‍यावर त्‍याला झालेला आनंद विलक्षण असतो. अशा आदिम स्थितीत माणसाला निसर्गातल्‍या प्रत्येक गोष्‍टीची तीव्र जाणीव असते. पण शहरातल्‍या आपल्‍या सुसज्‍ज फ्लॅटमध्‍ये एक बटण दाबून जेव्‍हा विजेची शेगडी पेटते आणि खोक्‍यातले तयार अन्‍न सहज शिजते, तेव्‍हा निसर्गाची कुठलीच जाणीव आपल्‍याला होत नाही. आपण खात असलेले अन्‍न कुठून आले, कुठे पिकले, आपण वापरत असलेले पाणी कुठून कसे आले, आपण वापरत असलेली उर्जा कुठून आली याविषयी शून्‍य जाणीव आपल्‍याला असते. ही तंत्रज्ञानाने आपल्‍याला आणलेली गुंगी आहे. आदिम मानव निसर्गावर जितका अवलंबून होता, तितकेच आपणही आहोत. पण याची जाणीव तंत्रज्ञानाच्‍या मायेने मिटवली आहे.

शहरातल्‍या मुलांचे ‘भैया दूध देतो’ किंवा ‘साखर रेशन दुकानात पिकते’ हे विनोद याच निसर्गनेणिवेतून तयार झाले आहेत. हे बालविनोद बाजूला ठेवले, तर मोठी माणसे नकळत याहून मोठे विनोद करत असतात. ‘बॅक टू नेचर’ किंवा ‘चला निसर्गाकडे जाऊया’ हे खूप चलनात असलेले विनोद आहेत. याचा अर्थ असा की, आपण निसर्गापासून स्‍वतंत्र आहोत, आणि एखाद्या सप्‍ताहांती जंगलात, डोंगरात, समुद्रावर आपण फिरायला जातो तेव्‍हा कुठे थोडासा निसर्ग आपल्‍याला भेटतो! अवलंबनाची जाणीव पूर्ण संपून आता करमणुकीसाठीच काय तो निसर्ग उरला आहे – अशा समजुतीत आपण वावरतो आहोत.

निसर्ग नावाच्‍या व्‍यवस्‍थेवर माणूस नावाच्‍या घटकाचा ताण पडत असेल तर यथावकाश ती व्‍यवस्‍था हा घटक नष्‍ट किंवा कमी करेल. निसर्गाचा कोणी कर्ता नसल्‍यामुळे निसर्ग माणसाला धडा शिकवेल वगैरे असे काही नाही. पण कोणतीही व्‍यवस्‍था काही मर्यादा आणि नियमांवरच चालत राहते. ज्‍या घटकाने नियम मोडले तो घटक दूर करणे हे एक अंतर्भूत तंत्र (बिल्‍ट-इन मेकॅनिझम) या व्‍यवस्‍थेत आहे. डायनासॉर संपले, इतर काही हजार प्रजाती संपल्‍या, तसेच माणूसही संपू शकतो. मग निसर्गाचे काय होणार? काहीही नाही, त्‍याचे चक्र फिरत राहणार.

मग आपण ‘निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा’ असा जो जागतिक आरडाओरडा करतोय तो कशासाठी? हे खरे तर आरशात बघून आरशातल्‍या त्‍या माणसाला वाचवा असे म्‍हणणे आहे. निसर्गातल्‍या विविध घटकांना माणसाने शोषल्‍यामुळे आता माणसालाच हे घटक कमी पडताहेत, आणि म्‍हणून हे घटक वाचवा असे आपण बोंबलतो आहोत. निसर्गतः माणूस इतर प्राण्‍यांप्रमाणेच स्‍वार्थी आहे. स्‍वार्थासाठी जसे पूर्वी निसर्गाला देवत्‍व दिले होते, तसे आता ग्‍लोबल वार्मिंगचा हार घातला आहे. माणूस वाचावा म्‍हणून निसर्ग वाचवणे अशी ही धडपड आहे.

इतका जर माणूस कमजोर आहे, तर निसर्गाला त्‍यापासून काय धोका असणार? माणूस निसर्गाचे शोषण (का काय म्‍हणतात ते) कधीपासून करतोय्? मला वाटतं की, संपत्‍तीची साठवण ही कल्‍पना माणसाला सुचल्‍यापासून हे चालू असेल.

भुकेपुरती शिकार किंवा खाण्‍यापुरती फळे, कंद गोळा करणे यात निसर्गातल्‍या इतर प्राण्‍यांपेक्षा वेगळे काही नव्‍हते. माणूस शेती करायला लागला तसे त्‍याचे नाते बदलू लागले. प्रारंभीची शेती फिरती होती. त्‍यात एका जमिनीच्‍या तुकड्याला कुंपण घालून ‘माझी प्रॉपर्टी’ असे म्‍हणणे हा भाग नव्‍हता. तोपर्यंत गरजेपेक्षा जास्‍त घेणे हे शक्‍यच नव्‍हते. फिरत्‍या समुहाकडे खूप प्रॉपर्टी साठली तर त्‍याला फिरताना ओझे होणार, त्‍यामुळे तो गरजेपुरते घेणार आणि पुढे जाणार. जशी लोकसंख्‍या वाढली, तशी फिरती शेती परवडेना झाली. लोक स्थिर शेती करायला लागले. शेतीत शिकारीसारखा झटपट फायदा नव्‍हता, अन्‍न मिळायला वाट बघावी लागणार होती. पण शिकारीत नसलेली शाश्‍वती इथे होती. वाट बघावी लागणार म्‍हटल्‍यावर कुंपण घालणे आलेच. इतर श्‍वापदे आणि माणसांपासूनही आपल्‍या शेतीची राखण आली. मोठ्या शिकारीत टोळीचे सामुहिक प्रयत्‍न लागतात, शेतीत कुटुंबातील माणसे पुरेशी असतात. कुटुंब हा घटक टोळीपेक्षा महत्‍त्‍वाचा व्‍हायला लागला, तो बहुधा इथूनच. वैयक्तिक संपत्‍ती, बचत, पुढच्‍या काळासाठी साठवण या गोष्‍टी आल्‍या. गरजेपेक्षा जास्‍त घेणे शक्‍य झाले आणि तेच शहाणपणाचे ठरले. निसर्गातले इतर प्राणी आणि माणूस यांच्‍यातला एकमेव भेद इथे निर्माण झाला.

कष्‍टमुक्‍त जगणे हे प्रत्‍येक जीवाला हवेच असते. अगदी पाळीव मांजराला सुध्‍दा दोन वेळा भरपेट खायला घातले, तर ते उंदीरबिंदीर पकडायच्‍या भानगडीत मुळीच पडत नाही. माणसालाही कष्‍ट कमी असणारे जीवन हवेच असते. त्‍यात भविष्‍यकाळासाठी जितकी जास्‍त बेगमी होईल तितका मी सुखी या कल्‍पनेनेही माणसाला पछाडलेले असते. आळस ही अनेक शोधांची जननी आहे. बटण दाबताच सगळे हजर हे माणसाने आपले ध्‍येय ठरवले. नव्‍याण्‍णव रूपये खिशात असले, तरी आणखी एक का नाही – हे नव्‍याण्‍णवाचे भूत माणसाने मानेवर बसवून घेतले. आणि अजून अजून अजून… अशी धावाधाव चालू राहिली. यात ‘निसर्गाचे शोषण’ असे ज्‍याला म्‍हटले जाते ते सुरू झाले.

हजारो वर्षे माणूस आहे, त्‍यातली काही शेकडो वर्षे माणूस शेती करतो आहे, शहरे वसवतो आहे, जंगलतोड करतो आहे, आणि गेली शंभरदीडशे वर्षे यंत्रशक्‍तीने वाट्टेल ते करतो आहे. तरीही ‘निसर्गाचे शोषण’ जाणवायला लागले ते मात्र गेली एकदोन दशके. असे का?

कारण आता हे गळ्याशी आले आहे. पायावर पाय पडताहेत. निसर्गाशी संघर्ष नसून माणूस माणसाशी संघर्ष करतो आहे. जी काही मर्यादित निसर्गसंपदा आहे, ती मलाच कशी मिळेल यासाठी माणसांच्‍या टोळ्यांचे संघर्ष आता सुरू आहेत. टोळ्या म्‍हणजे वेगवेगळे हितसंबंध असणारे मानवी समाजातले राजकीय आणि आर्थिक गट. या माणूस-माणूस संघर्षाची मला दिसणारी काही उदाहरणे सांगतो.

मी राहतो त्‍या गावातले एक उदाहरण आहे. आमच्‍या जंगलात उदंड आंब्‍याची झाडे आहेत. ज्‍याला जेव्‍हा पाहिजे तेव्‍हा हवे तेवढे आंबे खायला मिळतात. कोणीही कच्‍चे आंबे उतरवून घरात पेंढ्यात घालून पिकवत नाही. आंबे झाडावर पिकतात आणि तिथेच खायलाही मिळतात. पण आमच्‍या गावात मोहाची झाडे दोनच उरली आहेत. पहाटे, खरे तर रात्री साडेतीन चार वाजताच लोक मोहाची फुले वेचायला तिथे जातात. उशीर झाला तर बाकीचे लोक फुले नेतील म्‍हणून. आंब्‍याची झाडे म्‍हणजे Economy of abundance आणि मोहाची झाडे म्‍हणजे economy of scarcity आहे. आपण आंब्‍याकडून मोहाकडे म्‍हणजे म्‍हणजे समृध्‍दीच्‍या अवस्‍थेकडून कमतरतेच्‍या अवस्‍थेकडे चाललो आहोत. मोहाखाली जी स्‍पर्धा चालते ती माणूस विरूध्‍द मोह अशी नाही, ती माणूस विरूध्‍द माणूस अशी आहे. आमचे घर दोन दिवसांनी सारवायचे होते, तेव्‍हा आत्‍ताच भरपूर शेण साठवून ठेवूया असे मला वाटत होते. माझा गावातला मित्र मला हसला. म्‍हणाला, आपल्‍या गावात गुरं भरपूर आहेत, ती रोजच शेण देतात. कशाला साठवायचे, भरपूर शेण असते. जी गोष्‍ट भरपूर असते, ती कोणी साठवत नाही. जी गोष्‍ट कमी होते, ती गोष्‍ट माणूस वखवखल्‍यासारखी साठवून ठेवतो. निसर्गातली साधने कमी होताहेत तशी स्‍पर्धा-संघर्ष तीव्र होतो आहे. ही झाली सूक्ष्‍म स्‍तरावरची आणि बिनगुंतागुतीची उदाहरणे, आता बृहद् स्‍तरावरचे जंजाळ पाहू.  

उदाहरण 1: पिंपरी चिंचवड नावाचे एक महानगर असते, ते एकसारखे वाढत असते. अर्थातच त्‍याला लागणारे पाणी, उर्जा ही भूकही वाढतच असते. जुन्‍या पाणी साठ्यावर त्‍यांचे भागत नसते. तिथून राजाला प्रचंड महसूल मिळत असल्‍यामुळे तेथील मनुष्‍यसमूह अधिक महत्‍वाचा असतो. दूर कुठे तरी एक पवना नदीवरचे धरण असते. त्‍या धरणातल्‍या पाण्‍यावर मावळातील शेतकरी आपली शेती पिकवत असतात. तो मनुष्‍यसमूह महसूल देत नाही, म्‍हणून राजासाठी ते कमी दर्जाचे असतात. मग तिथल्‍या धरणाचे पाणी त्‍यांना न देता महानगराला दिले जाते. मग शेतकरी रस्‍त्‍यावर उतरतात, राजाचे शिपाई त्‍यांना गोळ्या घालतात, पण पाणी राजाला हवे तिथे घेऊन जातात. पाणी विरूध्‍द माणूस असा तर हा संघर्ष दिसत नाही.

उदाहरण 2:  मुंबईला वीज हवी असते. आयपीएलचे रात्रीच रंगणारे सामने आणि प्रचंड मॉलला गार ठेवणारे एसी या प्राथमिक गरजा भागवण्‍यासाठी ही वीज हवी असते. औष्णिक वीज बनवायची तर भट्टी गार करायला समुद्राचे भरपूर पाणी लागते. मग कोकणपट्टीतली एखादी जागा निवडली जाते. तिथे समुद्रातले पाणी स्‍वच्‍छ असेल, तर तिथल्‍या मच्‍छीमारीवर पोट भरणारे काही हजार लोक असतात. आंबा-पोफळी-माडाची बागायती करणारी किंवा त्‍यात मजुरी करणारी काही हजार कुटुंबे असतात. म्‍हणजे तिथले पाणी आणि जमिनी या निसर्गावर हक्‍क असणारा एक मनुष्‍यसमूह असतो. त्‍यांचा हक्‍क काढून घेऊन तो मुंबई नावाच्‍या टोळीला घ्‍यायचा असतो. मुंबईच्‍या ‘प्राथमिक गरजा’ महत्‍त्‍वाच्‍या असे राजा ठरवतो. जैतापूर किंवा दाभोळ (किंवा अशीच अजून कुठलीही दहापंध्रा नावे) गावातले लोक कमी महत्‍त्‍वाचे असेही राजा परस्‍पर ठरवतो. इथे प्रकल्‍पाला विरोध करणार्‍या लोकांना विकासाचे विरोधक आणि प्रकल्‍प लादणार्‍या लोकांना पर्यावरणाचे विरोधक अशा संज्ञा प्रचलित आहेत.

उदाहरण 3: खनिजतेल कमी वापरा अशी बोंबाबोंब अमेरिकेत कधी सुरू झाली? अरबांनी तेलविहीरींचे लगाम आवळल्‍यावर. संस्‍थानिक राजेरजवाडे आणि जिम कॉ‍र्बेटसारख्‍या शिकार्‍यांनी नेहरूंच्‍या मागे लागून गेम रिझर्व्‍ह – म्‍हणजे राखीव जंगले करून घेतली. ती कशाला? जंगले संपतील या चिंतेने नव्‍हे, तर आपल्‍याला शिकार करायला प्राणीच उरणार नाहीत या चिंतेने. त्‍यात काही लोकांनाच प्रवेश मिळेल आणि शिकारीचा परवाना मिळेल अशी सोय त्‍यांनी करून घेतली. जंगलात पूर्वीपासून राहणार्‍या लोकांना तिथून हाकलून लावले, की झाले नॅशनल पार्क. भरतपूरचे पक्षी अभयारण्‍य करतानाही तिथल्‍या म्‍हैसवाल्‍या गवळ्यांना हाकलून दिले होते. भरतपूरला श्रीमंत शिकार्‍यांनी येऊन हजारो चित्‍ते, बिबट्ये, आणि पक्षी मारले होते. त्‍यांच्‍या चुकीचे प्रायश्चित्‍त मात्र गवळ्यांना भोगावे लागले. आम्‍ही आधीच भरपूर शोषण केले आहे, आता तुम्‍ही मात्र करू नका अशी या महाजनांची भूमि‍का होती.

निसर्गसंपत्‍ती खूप कमी उरली आहे आणि त्‍यामुळे तिची किंमत खूप वाढली आहे. तीवर मालकी कुणाची हा संघर्षही तीव्र झाला आहे. याच संघर्षाला माणूस वि. निसर्ग अशा काल्‍पनिक संघर्षाचा बुरखा आहे. जंगलात राहणारे लोक (किंवा खेड्यात राहणारे) निसर्गाची खूप हानी करतात, ते चुलीत जाळायला लाकडे तोडतात, वस्‍तीजवळ बिबट्या आला तर त्‍याला मारतात. या गोष्‍टीची प्रचंड काळजी शहरात राहणार्‍या अनेक संवेदनशील लोकांना असते. पण आपण इन्‍हेस्‍टमेंट म्‍हणून जे दोन-तीन फ्लॅट घेऊन ठेवले आहेत, ते बांधताना तिथे शहराचा विस्‍तार होताना निसर्गाचा किती संहार झाला हे काही त्‍यांच्‍या गावी नसते. आपल्‍या विजेचा वापर बेफाट आहे, एक तासाचे लोडशेडिंगही आपल्‍याला सहन होत नाही, फ्रीजसुध्‍दा इन्‍हर्टरवर चालला पाहिजे, शेवटी काय दरडोई वीजवापर जितका जास्‍त तितके आपण विकसित (इति अनिल काकोडकर आणि जगद्गुरू अमेरिका). याच विजेसाठी धरण बांधण्‍यात किंवा कोळसा काढण्‍यात, वाहण्‍यात, निसर्गाची किती हानी आपण करत असतो, याचे मोजमाप नसते. पण आपली एखाददुसरी गाय किंवा बकरी वाचवण्‍यासाठी जो जिवावर उदार होऊन बिबट्याला मारायला धावतो, तो खेडूत मात्र पर्यावरणाचे मोठेच नुकसान करत असतो.

थोडक्‍यात असे की आपण एकमेकांकडे बोटे दाखवत आहोत. पुढे जमेल तेव्‍हा एकमेकांच्‍या उरावरही बसू. निसर्गाशी संघर्ष करायला तो आपल्‍या बरोबरीचा असायला हवा ना? तसे नाही. त्‍याच्‍याकडे लढायला ना दात ना नखे. आपणच आपल्‍या कर्माने मरणार म्‍हणजे निसर्ग. त्‍यामुळे आताचा संघर्ष हा माणसाचा माणसाशी निसर्गातला वाटा मिळवण्‍यावरून चाललेला संघर्ष आहे.

माणसाने निसर्गाला नागवण्‍याच्‍या प्रत्येक घटनेत माणसाने माणसाला नागवण्‍याची घटना अपरिहार्यपणे असते. मग ते लव्‍हासा असो, सरदार सरोवर असो, गीर नॅशनल पार्क असो, पॉस्‍कोची खाण असो, किंवा एनरॉन असो.

हे म्‍हणजे तुम्‍ही अगदी सगळ्याच गोष्‍टींना नावे ठेवता, मग आम्‍ही ‘विकास’ करायचा तरी कसा? असा प्रतिप्रश्‍न यावर हमखास विचारला जातो. ‘विकास’ कोणाचा हा प्रश्‍न गुलदस्‍त्‍यात ठेवला जातो. आणखी वीजनिर्मिती झाल्‍याशिवाय आपला विकास होणार नाही, असे म्‍हटले जाते. तेव्‍हा ही वीज कोणासाठी हे जाहीर केले जात नाही. ज्‍यांच्‍या जीविकेचा बळी देऊन किंवा ज्‍यांची गावे बुडवून किंवा ज्‍यांची नैसर्गिक संसाधने कब्‍जात घेऊन ही वीज निर्माण होणार त्‍या विजेतला किंवा विकासातला त्‍यांचा वाटा किती? याचे उत्‍तर दिले जात नाही. ज्‍यांना बुडवले किंवा हटवले जाते, त्‍यांनाही ही उत्‍तरे मिळत नाहीत. आमच्‍या भागात (ता. जव्‍हार जि. ठाणे) येथे प्रस्‍तावित धरणात ज्‍यांच्‍या जमिनी बुडणार आहेत, त्‍यांना तर जमिनीची किती किंमत मिळणार हेही सांगायची तसदी राज्‍यकर्त्‍यांनी घेतलेली नाही. ‘उत्‍तम पुनर्वसनाची तरतूद, पर्यटन व बांधकामातून रोजगाराची संधी’ अशी भोंगळ माहिती सरकारने दिली आहे. 23 हजार रू. हेक्‍टरी मिळतील, किंवा वीसेक लोकांना पर्यटनात रोजगार मिळेल, शंभर लोकांना एक दोन वर्षे अकुशल मजुरीचे काम मिळेल, कायमस्वरूपी नोकरी एकदोन जणांनाच (वाचाः पुढार्‍यांच्‍या मुलांनाच) मिळेल. अशी खरी माहिती सरकार देत नाही. म्‍हणून संघर्ष उभा राहतो. ‘विकास, विकास, विकास’ म्‍हणून जे काही होत, त्‍यात देशातल्‍या अडीच कोटी विस्‍थापित लोकांचा विकास कसा काय बसत नाही? माणसाने निसर्गावर ‘विकास’ नावाचे जे आक्रमण चालवले आहे, त्‍यातून हा एक नव ‘अस्‍पृश्‍य’ समाज वाढत चालला आहे. सर्वसमावेशक विकास नसेल, तर लोकशाहीला काय अर्थ उरतो?

विकास हवाच, पण तो काही जणांना नागडे आणि भुकेकंगाल करून कशाला? सर्वांना सन्‍मानाने जगण्‍यासाठी लागणार्‍या गोष्‍टी मिळाल्‍याच पाहिजेत. देशातल्‍या बहुसंख्‍य जनतेची रोजीरोटी नैसर्गिक संसाधनांवर आणि या संसाधनांवर असलेल्‍या त्‍यांच्‍या हक्‍कावर अवलंबून आहे. हे हक्‍क आणि संसाधने हिरावून घेतली तर हे लोक सुखाने कसे काय जगू शकतील? मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवे बांधताना काही कातकरी वाड्या हटवल्‍या गेल्‍या. या लोकांच्‍या जमिनी गेल्‍याच, पण त्‍यांना जीविकेचे दुसरे काहीच साधन सत्‍ताधारी टोळीने दिले नाही. आता यातले काहीजण एक्‍सेप्रसवे वरच लुटमारी करू लागले आहेत. त्‍यातले जे लोक असे काहीच करत नाहीत, त्‍यांनाही पोलिस संशयाने धरतात आणि ठोकून काढतात. नवीन गुन्‍हेगार जन्‍माला घालण्‍याला एक्‍स्प्रेसवेला विकास म्‍हणणारे आपण सर्वच जबाबदार नाही का? आपल्‍याच देशाच्‍या नागरिकांना विकासातून अस्‍पृश्‍य करण्‍याने निसर्गाची आणि लोकशाहीचीही जबर हानी होते आहे.

आपण सर्व नवस्‍वातंत्र्याच्‍या युगातले आहोत. व्‍यक्‍ती म्‍हणून आपले स्‍वातंत्र्य आपल्‍याला कमालीचे मोलाचे वाटते. रात्री शहरातल्‍या हमरस्‍त्‍यांवर आपली स्‍वेच्‍छावस्‍त्रे घालून फिरताना कोणी छेड काढली किंवा पोलिसांनी टोकले तरी (फेसबुकवर) प्रचंड खळबळ माजते. इतके स्‍वातंत्र्य आपल्‍याला मोलाचे वाटते. स्‍वातंत्र्याच्‍या पुरस्‍कर्त्‍या एका फ्रेंच तत्‍वज्ञाने म्‍हटले होते, ‘माझा हात वाटेल तसा हलवण्‍याचे मला स्‍वातंत्र्य आहे, पण ते इतकेच की हात दुसर्‍याच्‍या नाकाला लागता कामा नये.’ विकासाचे जे स्‍वातंत्र्य आपल्‍याला हवे आहे, त्‍यातही हे भान ठेवलेच पाहिजे. अन्‍यथा दुसर्‍याचाही हात आपल्‍याला कधी ठोसा देईल ते सांगता येत नाही.

कोणाचे नुकसान करू नका, त्‍या विस्‍थापित लोकांना काय हवं ते पुनर्वसन द्या, पण प्रकल्‍प कराच. असे म्‍हणण्‍याचा अनिवार मोह संवेदनशील विकासवाद्यांना होतोच. हे असं करता येईल का, हे काळ आपल्‍याला सांगेलच. पण माझा अंदाज असा आहे की असे जमणार नाही. निसर्ग किंवा नैसर्गिक संसाधनांवर मनुष्‍यजातीचा भार इतका आहे, की निसर्गाचे दोहन कमी करणे हेच यावरचे एक उत्‍तर असणार आहे. एसी कुठे लावता येईल याचा प्‍लॅन करण्‍यापेक्षा घरात नैसर्गिक वारा कसा वाहील याचा विचार करावा लागणार आहे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास, विजेचा कमी वापर, पाण्‍याचा जास्‍तीत जास्‍त पुनर्वापर, इन्‍हेस्‍टमेंटचा म्‍हणजे साठवणुकीचा अतिरेक टाळणे आणि अशी अनेक बंधने स्‍वीकारणे भाग आहे. आपला हात दुसर्‍याच्‍या नाकाला लागू नये म्‍हणूनच ही बंधने आहेत. हा दुसरा म्‍हणजे दुसरा माणूस आणि निसर्ग असे दोघेही असणार आहेत.

– मिलिंद थत्‍ते

मु. कोगदा-पाटीलपाडा, पो. कोगदे  

ता. जव्‍हार जि. ठाणे 401603

milindthatte@gmail.com            

    

बाबल्या तुंबडा आणि आपण सगळेच…

नाव बाबल्‍या तुंबडा. वय अदमासे 55. शिक्षण काही नाही. (म्‍हणजे पुस्‍तकी शिक्षण काही नाही, जंगलाचे शिक्षण अफाट). शेती आणि शिकार दोन्‍ही बापाकडून आणि आजाकडून शिकायला मिळाले. शेती हाच पोटाचा आधार. शेतीखाली असलेली जमीन सर्व चुलतभावडांमध्‍ये मिळून 52 एकर. त्‍यापैकी बाबल्‍याकाकाच्‍या वाट्याला सात एकर. या जमिनीवरून दर तीन-चार वर्षांनी लोकांना हुसकावण्‍याची मोहीम वनरक्षक काढतात. काही लोकांना अटक केली जाते, दंड भरल्‍यावर सुटका होते. काही जणांना नुसता दंड होतो. पण पिके सगळ्यांची नष्‍ट केली जातात. हातातोंडाशी आलेली नागली (नाचणी) आणि भात तुडवले जाते. शेतात बांधलेल्‍या झोपड्या जाळणे हा वनविभागाला फार आवश्‍यक वाटणारा कार्यक्रम आहे. या सर्व जमिनींवर वनविभागाने 1864 पासून पुढे अतिक्रमण केले आणि तिथपासून पुढे बाबल्‍या तुंबडा आणि अशा सर्वांना ‘अतिक्रमणदार’ ठरवण्‍यात आले. आपले पीक फॉरेस्‍टवाल्‍यांनी बरबाद करू नये, म्‍हणून दर वर्षी फॉरेस्‍ट गार्डांच्‍या व रेंजर साहेबांच्‍या घरी कमीत कमी एकेक पायली नागली, तूर, तांदूळ, उडीद असे धान्‍य प्रत्‍येक कुटुंबाने नेऊन ठेवायचे अशी पद्धतच होती. किमान तीन-चार पिढ्यांनी ही पद्धत पाळली. घर बांधायला लोक काहीच विकत आणत नसत. विकत आणायला पैसेच नसायचे. सागाच्‍या पानांनी छप्‍पर शिवायचे, कारवीच्‍या दांड्या वापरून कुडाच्‍या भिंती करायच्‍या, शेणामातीने त्‍या लिंपायच्‍या. वासे बनवण्‍यासाठी साग किंवा सादडा तोडायचा. हे वासे पकडण्‍यासाठी फॉरेस्‍टवाले रात्री दबा धरून बसत. वासा वाहून आणणार्‍या लोकांना हे पकडत, त्‍यांना धमक्‍या देऊन यथेच्‍छ कमाई करत. आणि शिवाय वासा जप्‍तही करत. पुढे हा वासा एखाद्या फॉरेस्‍टवाल्‍याच्‍या बंगल्‍यात कामी आलेला दिसायचा. गावात फेरीलाही फॉरेस्‍टवाले यायचे. एखादा नवीन घर बांधतो आहे असे दिसले की तिथे कोंबडी-दारू उकळायचे. आपला एखादा माणूस पकडला असेल, तर त्‍याला सोडवायला म्‍हणून लोक फॉरेस्‍टवाल्‍याकडे पाया पडायला जात. त्‍याच्‍या घरची भांडी घासायची, स्‍वैपाक करायचा, लाकडं फोडून द्यायची, काही नाही तर चहा बनवून द्यायचा. अशी कामे अगदी आता आतापर्यंत लोकांना करावी लागत. जंगलात वणवा रेषा काढणे, दगडी बांध घालणे, नवीन झाडांसाठी खड्डे खोदणे – ही सगळी कामे लोकांना फुकटच करावी लागत. या कामासाठी वनविभागाकडून दमडीचीही मजुरी मिळत नसे. त्‍यापेक्षा गावातल्‍या पाटलाच्‍या घरचे काम करणे परवडले. तो किमान दुपारचे जेवण तरी द्यायचा. जव्‍हार आणि विक्रमगड तालुक्‍यातल्‍या शेकडो आदिवासी गावांमध्‍ये हीच कहाणी होती.

कायदा बदलला खरा, पण…  

2008च्‍या मार्च महिन्‍यात वन हक्‍क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि बाबल्‍या तुंबडांसारखे हजारो आदिवासी शेतकरी सुखावले. ते पूर्वापार कसत असलेल्‍या जमिनींवर आता त्‍यांची मालकी होणार होती. तशी या कायद्याची हमीच होती. त्‍यांनी ग्रामसभेत निवडलेल्‍या गावाच्‍या वनहक्‍क समितीकडे आपापल्‍या जमिनीची मालकी मिळण्‍यासाठी दावे केले. समितीने प्रत्‍येकाची जमीन बघून आणि गावातल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांची कायद्याप्रमाणे साक्ष घेऊन हे दावे ग्रामसभेत ठेवले. व ग्रामसभांनी दावे मंजूर करून शासनाकडे दिले. साठ दिवसात उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आणि पुढच्‍या साठ दिवसात जिल्‍हाधिकारी निर्णय घेणार व लोकांना जमिनीचा पट्टा मिळणार असे कायद्यात म्‍हटले होते. एकशेवीस दिवस झाले, तीनशेपासष्‍ट दिवसही झाले. मग असे करत चार वर्षे वाट पाहण्‍यात गेली. कित्येकांना तरीही पट्टे मिळालेच नाहीत. आणि बाबल्‍याकाकांना वेगळाच धक्‍का मिळाला. त्‍यांची सात एकर जमीन असताना त्‍यांना एक एकराचा पट्टा मिळाला. त्‍यांनी इतरांना विचारले आणि असे लक्षात आले की त्‍यांच्‍या वेहेलपाडा गावात तीनशे शेतकर्‍यांना असेच कमी क्षेत्राचे पट्टे मिळालेत. ज्‍यांना पट्टाच मिळाला नाही, त्‍यांना तर काहीच कळत नव्‍हते.

शेजारच्‍या जव्‍हार तालुक्‍यातला बाबल्‍याकाकांचा मित्र प्रकाश नवसू बरफ. त्‍याला त्‍यांनी विचारले, तेव्‍हा तो म्‍हणाला आमच्‍याकडेही असेच आहे. त्‍याच्‍या कोगदा गावात असे दोनशे शेतकरी निघाले. यातल्‍या अनेकांनी प्रांत (उपविभागीय अधिकारी) साहेब आणि कलेक्‍टर साहेब यांच्‍या ऑफिसात चकरा मारून आम्‍हाला कमी जमिनीचा पट्टा का याची चौकशी केली. त्‍यांना उडवाउडवीची उत्‍तरे मिळाली. अपमान पुन्‍हा पुन्‍हा सहन करूनही लोक याचकासारखे विचारत राहिले. कधी तलाठ्याला, कधी फॉरेस्‍टवाल्‍याला, कधी प्रांत साहेबांच्‍या शिपायाला. असुनी खास मालक घरचा, म्‍हणती चोर त्‍याला – अशी अवस्‍था जव्‍हार आणि विक्रमगड तालुक्‍यातल्‍या हजारो आदिवासी शेतकर्‍यांनी सहन केली.

लोकांचा प्रश्‍न एवढाच होता – माझी वहिवाट आहे त्‍यापेक्षा पट्टयावर कमी जमीन का? कारण काय? काय पुरावा आहे सरकारकडे की मी कमी जमीन कसतो? लोकांना माहिती हवी होती आणि ही माहिती कोणीच देत नव्‍हते…

माहिती अधिकाराचा दणका

2008 ते 2013 अशी पाच वर्षे वाट बघून अखेर लोकांनी माहिती अधिकाराचे शस्‍त्र उपसले. बाबल्‍या तुंबडा, धोंडू टोकरे, प्रकाश बरफ, विनायक थाळकर, सलीम मोरघा, यांच्‍यासह 14 गावांमधल्‍या सातशे नागरिकांनी माहिती अधिकाराखाली ही माहिती मागणारे अर्ज केले. यांचे पाहून इतरही गावांमधल्‍या लोकांनी अर्ज कॉपी करून घेतला आणि 8 एप्रिल पासून पुढच्‍या चार दिवसात एकूण 1100 नागरिकांनी अर्ज केले.

वीस दिवसांनी लोकांना जव्‍हारच्‍या अपर जिल्‍हाधिकारी कार्यालयातून उत्‍तरे यायला सुरूवात झाली. सगळयांना एकच ठोकळेबाज उत्‍तर मिळाले. ‘ज्‍यांचे दावे उपविभागीय अधिकारी यांनी मान्‍य केले, त्‍यांचे दावे आम्‍ही मान्‍य केले आहेत. ज्‍यांचे दावे उपविभागीय अधिकारी यांनी अमान्‍य केले, त्‍रूांचे अमान्‍य झाले आहेत.’ असे हे उत्‍तर होते. यातून बाबल्‍याकाकाला त्‍याच्‍या दाव्‍याचे काय झाले याचा काहीच बोध झाला नाही. ‘अपील अभिलेखात शोधले असता तुमचा अर्ज मिळाला नाही. तथापि तुमचा अर्ज उपविभागीय अधिकारी जव्‍हार यांच्‍याकडे पाठवत आहोत.’ हे वाचून जयराम टोके म्‍हणाला, अहो आम्‍ही अपील केलेलेच नाही, तर आमचा अर्ज तुम्‍ही शोधताच कशाला? आणि आम्‍ही जी माहिती मागितली आहे, तिचा नि अपिलाचा काहीच संबंध नाही. ही उत्‍तरे पाहून ‘वयम्’ चळवळीच्‍या कार्यकर्त्‍यांनी जव्‍हारचे अपर निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍ता भडकवाड यांची भेट घेतली. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘एवढे अर्ज एका दिवशी करायचे म्‍हणजे माहिती अधिकार्‍याला टॉर्चर करताय तुम्‍ही! माझं अख्‍खं ऑफिस गेले पंधरा दिवस बाकीची कामे ठेवून तुम्‍हाला उत्‍तरे देण्‍याचंच काम करतंय्’. हे ऐकून संतोषला हसू आवरेना. एक ठोकळेबाज उत्‍तर फक्‍त नावे बदलून बदलून 1000 लोकांना पाठवायला यांच्‍या अख्‍ख्‍या ऑफिसला 15 दिवस लागले?

लोकांना कोणतीच माहिती मिळाली नाही, नुसतीच चेष्‍टा झाली. लोकांनी माहिती अधिकाराचे प्र‍थम अपील करायचे ठरवले. सुमारे पाचशे लोकांनी अपील अर्ज दाखल केले. बाकीचे अनेक जण मजुरीच्‍या शोधात गाव सोडून निघून गेले होते. रोजगार हमीच्‍या कामाची मजुरी तहसिलदार, बीडीओ, वनविभाग सर्वांनीच तीन तीन महिने थकवल्‍यामुळे लोकांना पोटासाठी गाव सोडणे भाग होते. याच काळात लोकांना अपिलावरील सुनावणीसाठी हजर रहा अशा नोटिसा आल्‍या. अक्षरशः पोटाला चिमटा काढून लोक सुनावणीला हजर राहिले. मे महिन्‍याच्‍या शेवटच्‍या दिवसात वाचवलेले पैसे पेरणी आणि लावणीच्‍या खर्चासाठी ठेवलेले असतात. अनेक लोक या दिवसात भाजीसुध्‍दा विकत घेत नाहीत. नुसताच डाळभात आणि काहीवेळा जंगलातून गोळा केलेल्‍या कंदभाज्‍या खातात. त्‍या दिवसात लोक सुनावणीला हजर राहिले.

सुनावणीतला छळ

माहिती अधिकार अपिलावरील सुनावणीत अपिलीय अधिकारी हे माहिती अधिकार्‍याला स्‍पष्‍टीकरण द्यायला सांगतात. मग अपिलार्थीला त्‍यावर काही म्‍हणायचे असल्‍यास त्याचे ऐकून घेतात. आणि माहिती देण्‍याविषयी आदेश देतात. जव्‍हारचे अ.नि.उपजिल्‍हाधिकारी दत्‍ता भडकवाड यांची शैली वेगळी असल्‍याचे अपिलार्थींच्‍या लक्षात आले.

मधु नावजी बीज, कमल्‍या दसमा खरपडे, रवी बापू उंबरसडा, गौरी बारखू गिंभल आणि आणखी चाळीस जणांची सुनावणी 30 मे 2013 ला झाली. त्‍यांना भडकवाड साहेबांनी पुढील प्रश्‍न विचारले.

भडकवाडः- तुम्‍ही एस्‍टीने आलात की तुम्‍हाला गाडीने कोणी घेऊन आले? भाडे किती लागले?

अर्जदारः- एस्‍टीने आलो. भाडे पन्‍नास रू.

भडकवाडः- आणि दिवस मजुरी किती बुडली?

अः-  तीनशे रू.

भः- हॉटेलात चहानाष्‍त्‍यावर 25 रू. म्‍हणजे एकूण चारशे रूपयाचं नुकसान झालं तुमचं. एवढा खर्च कशाला करत बसलाय? चुकीच्‍या वाटेला लागलात तुम्‍ही.  आता तुम्‍हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मुंबईला जायला लागेल. तिथे नुसत्‍या भाड्याचेच 100 रू होतील.

भः- हे फॉर्म भरायला कोण शिकवतो तुम्‍हाला? त्‍याने तुमचे फॉर्म भरले, अंगठा टेकवून घेतला आणि दिले पाठवून इथे. तुम्‍हाला हौस आली आहे हे फॉर्म भरायची. आता आम्‍ही तुमची हौस पुरी करून देतो. तुम्‍हाला पट्टा पाहिजे की माहिती पाहिजे?

अः- आम्‍हाला दोन्‍ही पाहिजे.

भः- माहिती पाहिजे असेल तर पट्टा मिळणार नाही.

भः- तुम्‍ही सगळे पैसे जमा करून कोणाकडे देता? इथे तुम्‍हाला कोण आणतो?

अः- आम्‍हाला प्रत्‍येकाला गरज आहे. आम्‍ही स्‍वतःचे स्‍वतः येतो.

यानंतर सुनावणी संपली. लोकांनी सुनावणीच्‍या प्रोसिडींगची कॉपी मागितली, पण ती मिळाली नाही. पुढचे दोन दिवस सुनावणी अचानक पुढे ढकलण्‍यात आली. आलेल्‍या लोकांना पुढची तारीख देण्‍यात आली. लोकांनी प्रवास खर्चाची झळ सोसली पण जिद्द सोडली नाही.

नोकरशाही की लोकशाही?   

देखना है जोर कितना बाजूए कातिल में हैं – असे म्‍हणण्‍याची पाळी स्‍वतंत्र भारताच्‍या नागरिकांवर आपल्‍याच सरकारने आणली. पहिल्‍या शंभर अर्जदारांची सुनावणी आजपर्यत झाली. अजून चारशे बाकी आहेत. जव्‍हारच्‍या अपर जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर एका झाडाखाली रोज चाळीस-पन्‍नास आदिवासी शेतकरी जमतात. सुनावणी सुरू होण्‍याची वाट पाहतात. तिथेच ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते लोकांसोबत उभे राहतात. लोकांशी बोलतात, ‘आपण लोकशाही मार्गाने लढतो आहोत. कायद्याने दिलेला हक्‍क आपल्‍याला मिळवायचाच आहे. आपल्‍या लोकशाहीवर विश्‍वास ठेवूया. लढू आणि जिंकू.’ पोटात भुकेची आग असते, डोक्‍यात अन्‍यायाचा राग असतो, पण हातात हत्‍यार कागदाचे असते. हे लोक हा लढा जिंकले तर लोकशाहीला मरण नाही.

तुम्‍ही आम्‍ही आपण सगळेच या लढाईत आहोत. तुमच्‍या जमिनीचा जीविकेचा प्रश्‍न असो नसो, तुम्‍ही ज्‍या लोकशाहीत सुखाने जगताहात, त्‍या लोकशाहीचा हा लढा आहे. कायदा धाब्‍यावर बसवून नोकरशाहीच देश चालवते की खरोखरच आपल्‍याला नागरिक म्‍हणून काही अधिकार काही किंमत आहे याचीच परीक्षा या लढ्यात होणार आहे. हिंसक चळवळीच तथाकथि‍त न्‍याय मिळवून देतात की सनदशीर मार्गही जिंकतो याचा फैसला लोक करणार आहेत.

बाबल्‍या तुंबडा हरला, तर तुम्‍हीही हरणार आहात. कदाचित तुमची तारीख पुढची असेल.

– मिलिंद थत्‍ते